Kiran Lohar : कोल्हापूर ते सोलापूर फक्त वाद आणि वादच ओढवून घेतलेल्या आणि वाद निर्माण केलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.  


लाचखोर किरण लोहार यांनी आजवर शिक्षण खात्यात केलेल्या 'पराक्रमाचा' आता हळूहळू उलघडा होत आहे. त्यांनी आजवर मिळवलेल्या मायेचा विचार केल्यास सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. किरण लोहार यांनी गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात 50 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास 'अपसंपदा' अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 


दरम्यान, किरण लोहार गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लाच घेताना रंगेहाथ सापडले होते. तत्पूर्वी, 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला.


सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती.


पीएच.डी आणि विद्यापीठाची सुद्धा चांगलीच चर्चा


किरण लोहार जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीवरून जितके वादग्रस्त ठरले. त्याच पद्धतीने त्यांची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे सूचनावजा फर्मान काढताना गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती, पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या