कोल्हापूर: थेट पाईपलाईनचे पाणी आल्यावर आम्ही काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचे स्वागत करू,असं भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी म्हटलं. ते कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते. सतेज पाटील यांनी कोणत्या निधीमधून एसी बस आणल्या माहीत नाही. पण कोल्हापूरकरांसाठी सुविधा मिळते हे महत्वाचे आहे, असंही धनंजय महाडिकांनी सांगितलं.
मी देखील कोल्हापुरात 100 इलेक्ट्रिक बस आणणार हे सांगितलं होतं. त्या बस लवकरात लवकर आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात येणार आहे. त्या कामाचे आम्ही देखील स्वागत करणार. पण थेट पाईपलाईनचे काम किती वर्षे चाललं, अजून किती वेळ लागणार यात जात नाही. चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हटलं पाहिजे. पण आम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं स्वागत सतेज पाटील करत नाहीत, असंही धनंजय महाडिक म्हणाले.
चांगल्या कामाचं कौतुक होईल
जे चांगलं काम होईल त्याचं कौतुकच होणार आहे. उद्या थेट पाईपलाईन जरी पूर्ण झाली तरी आम्ही त्यांचं कौतुक करू, अभिनंदनच करू. भविष्यात देखील विकासकामं करत असताना एकमेकांचे श्रेय मी तर कधीच घेत नाही आणि दुसऱ्यांनी देखील तसंच करावं चांगल्या कामांचे कौतुक करावं, असा अप्रत्यक्ष सल्ला महाडिकांनी सतेज पाटलांना दिला.
एकत्र कशाला यायला हवं?
कोल्हापूर शहराच्या कामासाठी एकत्र येणार का असा सवाल यावेळी धनंजय महाडिक यांना विचारण्यात आला. त्यावर महाडिक म्हणाले,"शहराच्या विकासासाठी एकत्र यायला कशाला पाहिजे? ते त्यांचे काम करत राहतील मी माझे काम करत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर
दिनांक 6 आणि 7 ऑक्टोबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा आहे. बावनकुळे यांचा दौरा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असेल. लोकसभेच्या निवडणुका 2024 ला होणार आहेत. या निवडणुका देशभरात साडेतीनशेहून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत.महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणायचे आहेत याची बांधणी सध्या राज्यात सुरू आहे, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.
सर्व निवडणुकांसाठी भाजपची तयारी
लोकसभा, विधानसभा, महापालिका, ग्रामपंचायती या सर्व निवडणुकांची तयारी आम्ही एकत्रित करीत आहोत. मागील दोन वर्षात कोविडमुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत. या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतील. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा आमची तयारी आम्ही बूथ स्तरापर्यंत करत आहोत या निवडणुकांची आम्ही व्यापक पद्धतीने तयारी करीत आहोत, असं महाडिक म्हणाले.
शिंदे गटाला कोणत्या जागा?
सध्या देशात आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्रितरित्या काम करीत आहे. शिंदे गटाचे ज्या ज्या ठिकाणी खासदार आहेत, ते त्या जागेवर निवडणूक लढवतील. हे सगळे निर्णय राज्यस्तरीय आणि देश स्तरावर घेण्यात येत आहेत. यात काही बदल झाले तर त्या वेळेप्रमाणे बदल करण्यात येते, अशी माहिती महाडिकांनी दिली.
45 नव्हे 48 खासदार निवडून येतील
याआधी शिंदे गट आणि भाजप एकत्रित काम करीत होते. मात्र आता अजित पवार यांची राष्ट्रवादीदेखील आमच्यासोबत आलेले आहेत त्यामुळे 45 खासदार ऐवजी 48 खासदार निवडून येतील असं म्हणायला काही हरकत नाही, असा विश्वास महाडिकांनी व्यक्त केला.
शरद पवारांची ऊर्जा अनमॅच्ड
शरद पवारसाहेब (Sharad Pawar) नरमलेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण शरद पवारांचा राजकीय प्रवास, त्यांचा अभ्यास, त्यांची ऊर्जा ही अनमॅच्ड आहे. सध्या त्यांचे राज्यासह देशभर दौरे सुद्धा सुरू आहेत. आता राजकीय वरिष्ठांसोबत त्यांची काय चर्चा झाली आहे हे आपल्याला माहिती नाही. पण अजित पवार हे विकासासाठी भाजपसोबत आलेले आहेत. मोदी यांचे विचार जोपासण्यासाठी ते आमच्यासोबत आलेले आहेत. त्याच पद्धतीने जर पवारसाहेब आमच्यासोबत येत असतील तर आनंदच आहे, असं धनंजय महाडिकांनी सांगितलं.
कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन कधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काल एका दिवसात नऊ वंदे भारत ट्रेन समर्पित केल्या. वंदे भारत ट्रेन कोल्हापूर ते मुंबई सुरू व्हावी अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे. या संदर्भातल्या बैठका सुरू आहेत. कालच या वंदे भारत संदर्भातले वेळापत्रकही जाहीर झाले. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत जाण्यासाठी मिरज इथं ट्रॅकचं थोडं काम आहे ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.पुढील दोन महिन्यात वंदे भारत कोल्हापूरला सुरू होण्याची शक्यता आहे, असा महाडिक म्हणाले.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर कुणाचा दावा?
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आपला दावा सांगितलेला आहे. राजेश क्षीरसागर हे आमच्या सोबत आहेत. मात्र दक्षिण मतदारसंघात यापूर्वी भाजपचे आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदार संघातून अमल महाडिक हेच निवडणूक लढवतील आणि ते जिंकूनही येतील. दक्षिणचे लोक हे महाडिकांसोबतच आहेत, असा विश्वास महाडिकांनी व्यक्त केला.
टोमॅटोला भाव नाही
सध्या राज्यभरात टोमॅटोचे दर पडलेले आहेत. मधल्या कालावधीत हेच टोमॅटो चांगल्या दराने विकले जात होते. सध्या पुन्हा त्याचे दर पडले असून त्याला दोन रुपयांचा भाव देखील मिळत नाही. या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकार गंभीर दखल घेत आहेत.टोमॅटोच्या दरांमध्ये बॅलन्स राहिला पाहिजे. मागणी आणि पुरवठ्यामध्ये योग्य बॅलन्स न राहिल्यामुळे अशी गडबड होत आहे. इतर पिकांप्रमाणेच टोमॅटो संदर्भात देखील केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेईल, अशी ग्वाही अमोल महाडिक यांनी दिली.
राजाराम सहकारी साखर कारखाना
राजाराम सहकारी साखर कारखान्याचा विस्तार होत आहे, तर याला विरोध कशाला करताय? पूर्वी विस्तार होत नव्हता म्हणून टीका करत होते, आता विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतरही टीका होत आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याचं कार्यक्षेत्र वाढवण्यासंदर्भात ठराव होणारच आहे त्याला विरोध करू नये, असं आवाहन महाडिकांनी केलं.
कोल्हापूर मुंबई विमानसेवा
15 ऑक्टोबर पासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरतून विमान सुटेल आणि मुंबईत सव्वा अकरा वाजता पोहोचेल. गेल्या अनेक वर्षांची ही मागणी होती ती आता पूर्ण झालेली आहे, असं महाडिक म्हणाले.
इलेक्ट्रिक बस
कोल्हापूरच्या विकासासाठी एखादी गोष्ट होत असेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करू, पण येत्या काळात कोल्हापूरकरांसाठी नव्या शंभर इलेक्ट्रिक बस आम्ही आणणार आहोत, असं आश्वासन महाडिकांनी दिलं.
संबंधित बातम्या
त्यांच्या पक्षात दम राहिला नाही, नागपुरात जाऊन अंबादास दानवेंचा बावनकुळेंवर हल्लाबोल