कोल्हापूर: खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे (Rahul Prakash Awade) या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या दोन्ही ड्रायव्हरांनी एकमेकांचे कपडे फाडले, एकमेकांना बेल्टने मारहाण करत फ्री स्टाईल हाणामारी केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासमोरच ही हाणामारी सुरू होती. इचलकरंजीमध्ये झालेल्या या वादाची आता जिल्हाभर चर्चा सुरू आहे. 


पालकमंत्री हसन मुश्रीफ आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी (Kolhapur Flood) आलेले असतानाच खासदार आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरांमध्ये ही हाणामारी झाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्याने या ड्रायव्हरांमध्ये वाद झाला. तो वाद नंतर वाढत गेला. या दोघांपैकी कुणीही माघार घेईना. आधी एकमेकाला अश्लील शिवीगाळ केली आणि त्यानंतर एकमेकांना बेल्टने मारहाण केली. ही हाणामारी इतकी विकोपाली गेली की त्यामध्ये दोन्ही ड्रायव्हरांचे कपडे फाटले. 


फ्री स्टाईल मारामारीची जिल्ह्यात चर्चा


हसन मुश्रीफ हे पूरग्रस्त भागामध्ये पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी हा वाद झाला. त्यानंतर मुश्रीफांच्या ड्रायव्हरने या दोघांमध्ये मध्यस्ती केली. पण पुरग्रस्त पाहणीवेळी खासदार आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरमध्ये झालेल्या या वादाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.