कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनेक उमेदवार उभे ठाकल्याने परिस्थिती नाजूक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. ते आज कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात जोडण्या लावणार असून हातकणंगलेमध्ये अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनीही उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्याने त्यांची नाराजी कशी दूर करणार? याकडे लक्ष होते. तथापि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल 45 मिनिटे बैठक होऊनही आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 


इचलकरंजीमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता


गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवार बदला, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली आहे. मतदारसंघांमध्ये माने दिसत नसल्याने सुद्धा खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. त्यामुळे माने विरुद्ध आवाडे असा संघर्ष सुरुच राहिल्यास इचलकरंजीमध्ये त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आवाडे यांची भेट झाली आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनेक नेते उपस्थित आहेत.  


दुरंगी लढत अपेक्षित असतानाच थेट पंचरंगी लढत


हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत दुरंगी लढत अपेक्षित असतानाच थेट पंचरंगी लढत होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात माने हेच एकमेव उमेदवार असतील असे वाटत असताना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. यानंतर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार देण्यात आला. त्यामुळे सत्यजित पाटील सरूडकर हे सुद्धा उमेदवारीच्या रिंगणात आहेत, तर प्रकाश आवाडे यांनी सुद्धा आता हातकणंगलेत उतरण्याची घोषणा केल्याने तब्बल पाच मातब्बर उमेदवार हातकणंगलेमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे या मतविभागणीचा नेमका फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. 


खासदार कसा असतो हे दाखवून देणार


दुसरीकडे प्रकाश आवाडे हे शेवटपर्यंत रिंगणात राहतील की नाही याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये मतमतांतरे आहेत. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेचे गणित सोडवून घेण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी लोकसभेसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभेचा शब्द क्लिअर झाल्यास प्रकाश आवाडे आपली तलवार म्यान करू शकतात, अशीही चर्चा आहे. प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरताना आपल्याला कोणीही अर्ज भरण्यास सांगितलं नसल्याचा दावा केला आहे. एकदाच खासदार होणार आणि खासदार कसा असतो हे दाखवून देणार अशी भूमिका प्रकाश आवाडे यांनी घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या