कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (13 एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारपासून शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा आहे. कोल्हापुरात आगमन केल्यानंतर ते हॉटेलवर विविध मान्यवरांच्या ते गाठीभेटी घेतील. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ते सांत्वन पर भेट देणार आहेत.


शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये


कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत. मात्र, कोल्हापूरच्या तुलनेमध्ये हातकणंगलेत परिस्थिती काहीशी नाजूक आहे. दुरंगी लढत होईल असे चित्र असताना आता थेट पंचरंगी लढत होत आहे. भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगलेतील शिलेदारांशी काय चर्चा करणार याकडे सुद्धा लक्ष आहे.


दोन्ही उमेदवारांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणार?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वीच गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना फोन करून कोल्हापूरच्या दोन्ही उमेदवारांना ताकद लावण्यासाठी सांगितले होते. डोंगळे यांनी सुद्धा उमेदवारांसाठी ताकद लावत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुख्यमंत्री स्वतः कोल्हापुरात येत असल्याने आता कोणाकोणाच्या गाठीभेटी घेणार आणि दोन्ही उमेदवारांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणार? याकडे सुद्धा लक्ष आहे. प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी केल्याने माने यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. माने आणि प्रकाश आवाडे या दोन्हींचे सर्वाधिक लक्ष इचलकरंजीवर आहे. त्यामुळे इचलकरंजीमधील मतविभागणी होऊन त्याचा फटका माने यांनाच बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाडे यांच्या संदर्भात शिंदे कोणती भूमिका मांडणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.


कोल्हापूरचे मतदार संजय मंडलिक यांनी करवीरचे कर्मवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या दत्तक वारसा विधानावरून केलेल्या वक्तव्याने सुद्धा कोल्हापूरमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शाहूप्रेमी जनता त्यांना भेटून निवेदन देते का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या