Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा पेच सुटलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाचे वाटप झालेलं नाही. मात्र,15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याबाबत स्पष्टता आली आहे. 28 जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत, तर 7 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.


कोल्हापुरात केसरकर, चंद्रकांत पाटील अन् हसन मुश्रीफ सुद्धा बाजूला


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? या संदर्भात सातत्याने चर्चा आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे असूनही चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, या दोघांनाही कोल्हापुरात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली नसून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारच कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहेत. कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर हे त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणार आहेत. सुरेश खाडे यांच्या हस्ते सांगलीमध्ये ध्वजारोहण होईल. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई ध्वजारोहण करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये करतील. 


चंद्रकांतदादा पुण्यात, मुश्रीफ सोलापुरात 


दरम्यान, पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, असेही बोलले जात होते. मात्र, त्याठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच जबाबदारी पार पाडतील. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर डोळा ठेवून असलेल्या मुश्रीफ यांना सोलापुरातून संधी मिळाली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद असल्याने त्याठिकाणी जिल्हाधिकारीच करणार आहेत. 


हसन मुश्रीफांकडे पालकमंत्रीपद येणार?


अजित पवार गट सत्तेत सहभागी खातेवाटप बरेच दिवस रखडले होते. त्यानंतर अजित पवारांनी मातब्बर खाती आपल्या पदरात पाडून घेतल्याने शिंदे गटात सन्नाटा पसरला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचाही पेच कायम आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कोल्हापूर आपल्याकडे घेऊन हसन मुश्रीफांचा मार्ग मोकळा केला आहे का? अशीही चर्चा आहे. केसरकरांना बाजूला करून अजित पवार कोल्हापुरात येत असल्याने कोल्हापूरची भविष्यात हसन मुश्रीफ यांच्या रुपाने त्यांच्याकडेच राहील अशीही शक्यता आहे. केसरकरांच्या कार्यशैलीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड नाराजी आहे. त्यांनी पुरावरून केलेल्या विधानावरुनही कोल्हापुरात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार गटाकडे येण्याचेच संकेत अजित पवार यांच्या ध्वजारोहणातून मिळत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या