Kolhapur Water Update: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहुवाडी आणि भुदरगड, राधानगरी तालुका सोडून अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना सुरू होऊन दहा दिवस झाले तरी कोल्हापूरमध्ये दमदार पाऊस झालेला नाही. जी पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे कोणताही परिणाम होत नसून अतिशय संथ गतीने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फक्त राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तीन तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह उर्वरित जिल्ह्यात परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. कोल्हापूर शहरासह, करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळ या तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पन्हाळा, चंदगड आणि आजरा, गडहिंग्लज तालुक्यात काहीसा समाधानकारक पाऊस झाला आहे. 


कोल्हापूर धरणांची स्थिती चिंताजनक


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण छोटे-मोठे मिळून 15 धरणे आहेत. यामधील केवळ चंदगड तालुक्यातील घटप्रभा आणि गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणाचा अपवाद सोडल्यास सर्वच धरणांची पाणीपातळी खालावली आहे. केवळ घटप्रभा आणि कोदे लघू प्रकल्प भरला आहे. उर्वरित 11 धरणांमध्ये सरासरी 35 टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. काळम्मावाडी धरणात केवळ 14.65 टक्के पाणीसाठा आहे. 


गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 15 टीएमसी कमी पाणीसाठा 


कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ आणि कोदे असे 15 प्रकल्प आहेत. सर्व प्रकल्पांची पाणी क्षमता 91.81 टीएमसी इतकी आहे. मात्र 10 जुलै सकाळी सातपर्यंत केवळ 30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणाची  पाणीक्षमता 34.399 टीएमसी इतकी आहे. सध्या जिल्ह्यात वारणा धरणासह मिळून केवळ 30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी (10 जुलै) हाच पाणीसाठा   जवळपास निम्म्यावर म्हणजेच 44.89 टीएमसी इतका आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 15 टीएमसी कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील घटप्रभा प्रकल्प दोन दिवसांपूर्वी भरला होतास, तर कोदे बंधारे प्रकल्प शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. या दोन प्रकल्पांचा अपवाद वगळल्यास सर्वच धरणांमध्ये पाणी पातळी खालावलेली आहे. 


जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ हे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर भोगावती नदीवरील हळदी आणि कोगे बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर संदर्भात हवामान विभागाचा अंदाजही फोल ठरला आहे. ज्या दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला त्या दिवसांमध्ये कडकडीत ऊन पडले होते. गेल्या तीन दिवसांपासून राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा आणि भुदरगड या चार तालुक्‍यांचा अपवाद वगळल्यास इतर सर्व ठिकाणी पावसाची फक्त रिपरिप सुरु आहे. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला असला, तरी धरणांच्या पाण्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या