Crocodile In Panchganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील रांगोळी गावामध्ये पंचगंगा नदी घाटावर स्मशानभूमी परिसरात मगर दिसल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कृष्णा आणि वारणा नदी पाठोपाट आता पंचगंगा नदीतही मगरींचे दर्शन होत आहे.त्यामुळे या परीसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या मगरीचा शोध घेऊन मगरीचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नदीकाठच्या शेतकरी वर्गातून होत आहे.
आज सकाळी सचिन कुरुंदवाडे आणि रणजित कमते हे शेतकरी वैरण आणणेसाठी पंचगंगा नदी परिसरात गेल्यानंतर त्यांच्या नजरेस मगर पडली. मगर 10 ते 12 फूट लांब असावी असा अंदाज दर्शविण्यात येत आहे. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मगर नसल्याची पूर्ण खात्री करूनच नदीकाठी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात कृष्णाकाठी दहा मगरी आढळल्या
दरम्यान, गेल्या महिन्यात 4 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला होता. या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत होता.
यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान कृष्णा नदी पात्राबाहेर असल्याने पूरस्थिती असायची. अशावेळी मगरींना आजूबाजूला चरी, ओढे, वगळी शेतांमध्ये वावर पाहायला मिळायचा. यंदा मात्र पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडलेला नाही.
कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते. सांगली जिल्ह्यात मगरीची आजही दहशत आहे. याच परिसरात अनेक वेळा मगरींकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर मगरींनीही अनेक प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्याला मगरीने ओढून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी पलूस तालुक्यातील चोपडेवाडीत 26 मे 2022 रोजी घडली होती.
इतर महत्वाच्या बातम्या