Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या विधी शाखेच्या सहाव्या सत्रातील इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स (आयपीआर) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेवरून चांगलाच गदारोळ झाला होता. या विषयाची प्रश्नपत्रिका ही खूप कठिण सेट केल्याने तसेच बरेच प्रश्न चुकीचे आणि अभ्यासाबाहेरचे असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. यानंतर काही विद्यार्थ्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राजभवन सचिवालयाने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पत्र पाठवतच योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. 


विधी शाखेच्या आयपीआर विषयाची प्रश्नपत्रिका विद्यापीठाने जाणीवपूर्वक अत्यंत कठीण स्वरूपाची काढल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे अर्जाद्वारे केली होती. या पेपरवेळी सांगलीतील एका विधी महाविद्यालयामध्ये गैरप्रकार झाल्याचे कारण सांगत विद्यापीठाने या पेपरची २६ दिवसांनी पुर्नरीक्षा घेतली. मात्र, या पेपरबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज केले होते. त्याची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही.


विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल होत असतील, तर त्यावेळी या प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून विद्यापीठाच्या पॅनलवरील विषय तज्ज्ञांची समिती नेमून याबाबत अहवाल मागविणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाने तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसून आले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन राजभवन सचिवालयाकडून कुलगुरू डॉ. शिर्के यांना पत्र पाठविण्यात आले आहे.


दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सात महाविद्यालये येतात. 2021-22 बऱ्याच महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंग विधी आणि इतर अभ्यासक्रमांच्या शाखा उशिरा सुरू झाल्याने त्यांचा अभ्यासक्रम शिकून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विधी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


इतर महत्वाच्या बातम्या