कोल्हापूर : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समन्वय समिती निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेईल आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वय प्रस्थापित करणार आहे. या समितीत काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे. जागा वाटप समन्वय समितीमध्ये काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, नितीन राऊत यांचाही समावेश आहे. मुंबईमधील जागावाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख या तिघांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनं ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीला शाहू महाराज यांना निवडून आणण्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा होता.
प्रदेश काँग्रेस संघटनेत कोणताही बदल होणार नाही
23 जुलै रोजी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेश काँग्रेस संघटनेत कोणताही बदल होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील संख्याबळाच्या आधारे जागावाटप करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले होते की, महाविकास आघाडी (MVA) आघाडी महाराष्ट्रातील विद्यमान भ्रष्ट सरकारचा पराभव करण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधारी भाजपला धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. वेणुगोपाल मुंबईतील एका बैठकीत सहभागी झाले होते, ज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी आणि निवडणुकीची रणनीती यावर चर्चा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी एमव्हीएचा चेहरा आणि जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. वेणुगोपाल म्हणाले की एमव्हीए अंतर्गत जागा वाटपाची चर्चा एकत्रितपणे केली जाईल आणि पक्ष बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करेल.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा खुलासाही त्यांनी केला होता. वेणुगोपाल म्हणाले की, देशातील राजकीय वातावरण बदलत आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या 13 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्याचे उदाहरण दिसले, जिथे भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या, तर इंडिया आघाडीने 11 जागा जिंकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या