कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) बाबतीत टोलवाटोलवी सुरु आहे. मराठा आरक्षण बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मत स्पष्ट करावे तसेच भाजप आणि शिवसेनेने सुद्धा मत स्पष्ट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आज कोल्हापूरमध्ये (Prakash Ambedkar In Kolhapur) पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली. ओबीसींचे 100 आमदार निवडून आले पाहिजेत असे आमचे मत आहे. आमची राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले. संविधान बचाव हा अजेंडा आम्ही सुरुवातीला घेतला होता. मात्र, त्यानंतर तो इंडिया आघाडीने घेतला. त्यामुळे मुस्लिम मते इंडिया आघाडीकडे वळली आणि आमच्या मतांमध्ये घट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला


सगेसोयरेला आमचा विरोध 


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगेसोयरे आरक्षणाला आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने सगेसोयरेबाबत जे जजमेंट दिलं आहे त्यामध्ये सगेसोयरे आरक्षण नाकारलं असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण देखील टिकणार नाही, त्यामुळे योग्य सल्ला घेऊन हे केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावर बोलताना काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ मराठ्यांचा पक्ष राहिला आहे. मराठा आरक्षणावर भाजप आणि शिवसेना देखील भूमिका स्पष्ट करत नाही. भाजप झुंजी लावून कसे लढतात हे बघत बसला आहे, अशी टीका त्यांनी केली. 


आम्हाला दोन्हीकडून वाजवलं जाणार 


प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की मी ज्या समाजाचा आहे त्याची मत मला कशी मिळतील याचा प्रत्येक जण विचार करत आहे. शांतता राखावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यात्रा झाल्यानंतर विधानसभेचे बघू असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला दोन्हीकडून वाजवले जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे म्हणतात ते आमचे नाहीत आणि दुसरे म्हणतात हे आमचे नाहीत. त्यामुळे आम्हाला दोन्हीकडून बाजूला जाणार हे आम्हाला माहित आहे. मला भाजपची बी टीम सुद्धा म्हणतात पण मला कोणी हरवलं? अशी विचारणा त्यांनी केली. मला भाजपने हरवलं मग कसं म्हणता? असा प्रश्न त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या