कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या बिद्री साखर कारखान्यातील (Bidri Sakhar Karkhana) पडसाद आज गारगोटीमधील कोल्हापूर (Kolhapur) उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसून आले. कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाकडे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भूवया उंचावल्या. त्यामुळे कोल्हापुरात शिंदे आणि अजित पवार गटातील संघर्ष कायम आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या मतदारसंघातील गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन आज (24 डिसेंबर) आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. मात्र, या कार्यक्रमाला मुश्रीफ यांनी पाठ फिरवली.
बिद्री कारखान्याच्या निमित्ताने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील असा संघर्ष रंगला आहे. अजित पवार गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला साथ दिली होती. त्यांना सोबत घेण्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी भूमिका बजावली होती. मात्र, विरोधी आघाडीचा धुव्वा उडवत मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने के. पी. पाटील यांनी बिद्री कारखान्यात सत्ता राखली आहे.
राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, हा व्हेरियंट सौम्य आहे. केरळमध्ये जे तीन मृत झाले त्यात जेएन 1 नव्हता. काल (23 डिसेंबर) टास्क फोर्सची याबाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे. येत्या काळात गर्दीचे कार्यक्रम आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे.
कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नसल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला. कोल्हापूरमध्ये कोविड काळात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याची मी पूर्ण माहिती घेतली नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, कोणी दोषी आढळलं, तर कावाई नक्की होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर तानाजी सावंत यांनी अधिक प्रतिक्रिया देणं टाळले. जरांगे पाटील यांच्या निर्णयाबाबत पक्षाचे वरिष्ठच बोलू शकतील, असे सांगत सावध पवित्रा घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या