Almatti Dam : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 टीएमसी आहे. आतापर्यंत 117.376 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या 37 हजार 41 क्युसेस पाण्याची आवक होत आहे, तर 72 हजार क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुट 2 इंचावर
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आह. आज 4 वाजेपर्यं राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील ५ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तसेच पाॅवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून सतर्कतेचे आवाहन
दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने होत असलेली वाढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.