Bidri Sakhar Karkhana: बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निवडणूक कार्यक्रमाला आहे त्या स्थितीमध्ये स्थगिती देण्याचा आदेश आल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी सत्तेचा गैरवापर करुन चुकीच्या पद्धतीने कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली असल्याचा आरोप के. पी. पाटील यांनी केला. निवडणुकीला स्थगिती दिल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद  मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


बिद्री सभासदांचे विकास मंदिर 


के. पी. पाटील म्हणाले की, बिद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रात जनाधार मिळणार नाही हे लक्षात आल्याने सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुकीला स्थगिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यात इतर संस्थांच्या निवडणुका होत असताना केवळ बिद्री कारखान्याचीच निवडणूक थांबवली आहे. हे कायदाबाह्य असून या आदेशाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बिद्री तमाम सभासदांचे विकास मंदिर आहे. किमान या मंदिरावर दगड मारण्याचे काम विद्यमान आमदारांनी करु नये. न्यायालयात आम्हाला निश्चित न्याय मिळेलच; परंतु तिथेही न्याय न मिळाल्यास जनतेच्या कोर्टात निश्चित न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.


सभासदांची दिशाभूल करत आहेत


पाटील पुढे म्हणाले, शासनाच्या आदेशाने शेअर्स रकमेत पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी झाला आहे. मात्र, विरोधक सभासदांची दिशाभूल करत आहेत. कारखान्याच्या कारभारावर सभासदांचा विश्वास असल्याने केवळ एका आवाहनावर 27 कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कारखान्याच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी सभासदांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून संस्थेला सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार, तोडणी कामगार या सर्वांची बिले वेळेत अदा होत आहेत. कामगारांचे फिटमेंट करण्यासह त्यांना नियमित पगार व 28 टक्के बोनसही दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 


सध्या काळजीवाहू संचालक मंडळ 


दरम्यान, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी प्रसिद्ध केली आहे. मतदानासाठी 'अ' वर्ग उत्पादक सभासद मतदार 55 हजार 65 इतके आहेत, तर 'ब' वर्ग संस्था गटासाठी 1022 व चार व्यक्ती असे मतदार पात्र ठरले आहेत. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी संपल्याने सध्या काळजीवाहू संचालक मंडळ काम करत आहे. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची संख्या 21 वरुन 25 करण्यात आली आहे. कारखान्याचे राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील 218 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या