Rankala Kolhapur : कोल्हापूर शहराचे वैभव ऐतिहासिक रंकाळा सध्या मरणयातना सहन करत आहे. एका बाजूने रंकाळ्याच्या संरक्षक कोसळून पडत असतानाच दुसऱ्या बाजूने रंकाळ्याचे प्रदुषणही वाढत चालले आहे. प्रदुषणाचा स्तर वाढल्याने संध्यामठजवळ काल छोटे कासव तसेच मासे मेल्याचे निदर्शनास आले. गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्याने रंकाळ्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. 


रंकाळ्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने परिस्थिती भयावह होत आहे. काल संध्यामठजवळ मृत मासे आढळले. यापूर्वी राजघाटापासून संध्यामठ, तांबट कमान, जलसंपदा विभागाजवळ मोठे मासे मेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी  मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी करत मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकून मेल्याचा दावा केला होता.  संध्यामठजवळ मेलेल्या माशांजवळ मेलेले एक छोटे कासव स्थानिकांनी काठ्यांच्या मदतीने कासवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. 


रंकाळ्याजवळ दुर्गंधीचे साम्राज्य 


एका बाजूने रंकाळा सांडपाण्याने प्रदुषित होत असतानाच संध्यामठजवळ प्रचंड कचरा जमा झाला आहे. त्याकडे अजूनही महापालिकेचे लक्ष गेलेलं नाही.


संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी तडे 


रंकाळ्याच्या संरक्षक भिंतींनाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी  कोसळल्या आहेत. पदपथ ठिकाणाची भिंत दोन ठिकाणी काही दिवसांपूर्वी कोसळली आहे. मागील महिन्यात रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता.


शहरातील नागरिक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात रंकाळा तलावाला दररोज भेट देत असतात. मॉर्निंग वॉकला अनेक नागरिक रंकाळा परिसरात येत असतात. अनेक पर्यटक या संरक्षक भिंतीवर बसून तलावाचे सौंदर्य पाहत असतात. परिसरातील तसेच बाहेरील अनेक नागरिक बागेत जंगली झाडे लावत असल्याने त्या झाडांच्या मुळांमुळे संरक्षक भिंतीला धोका निर्माण होत आहे. भिंतीला तडे गेल्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कट्ट्यावर बसणेे धोकादायक बनले आहे. 


साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी संपूर्ण रंकाळ्यात दुषित पाणी येऊन मिसळल्याने केंदाळाचे साम्राज्य होते. त्यामुळे हे केंदाळ बाहेर काढण्यासाठी भिंत पाडून कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर केंदाळ काढण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही भिंत बांधण्यात आली होती.  मात्र, सुमार दर्जाच्या बांधकामामुळे ही भिंत काही वर्षांमध्ये ढासळली गेली. शालिनी पॅलेस समोरील भिंतही कोसळली आहे. त्यामुळे जागोजागी भिंतीला तडे जाऊन कोसळली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या