Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय चित्रपट महामंडळातील तमाशा सुरुच आहे. दावे प्रतिदावे करत दोन्ही गटाकडून निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी तगडा हादरा देत निवडणूक रद्द केली आहे.
धर्मादाय आयुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक नियंत्रक म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली. तसेच सात दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. शिवराज नाईकवाडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिवही आहेत.
दोन्ही गटांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
चित्रपट महामंडळातील दोन गटातील धुसफूस काही संपण्याची चिन्हे नसून गेल्या आठवड्यात मेघराज राजेभोसले यांनी आपणच महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा दावा करत महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक अधिकारी नियुक्त केले. त्यानंतर घोषित केलेली निवडणूक अमान्य असल्याचे सांगत धनाजी यमकर यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करत त्यांनीही निवडणूक अधिकारी नियुक्त केले.
दोन्ही गटाकडून दावा केल्याने सभासदांमध्येही संभ्रम
यामुळे अधिकृत निवडणूक कोणती यावरून संभ्रम निर्माण झाला होता. एकाच संस्थेच्या एका महिन्यात दोन निवडणुका तसेच दोन्ही बाजूंनी आमचीच निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकांविरोधात तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी हा निकाल दिला. त्यानुसार दोन्ही बाजूंची निवडणूक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे.
दरम्यान, चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर झालेली नाही. त्यामुळे जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर मतदान होईल. त्यात 18 हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील.
गेल्या दीड वर्षांपासून निवडणूक नाही
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली आहेत. कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक घेण्यात आली नव्हती. मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीकडून मेघराज यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. याचा महामंडळाच्या कामावरही परिणाम झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या