कोल्हापूर : रक्तरंजित संघर्ष सुरु असलेल्या बांगलादेशमध्ये कोल्हापूरचे 15 विद्यार्थी अडकले आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी माझी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचे  आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या15 विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले. सतेज पाटील यांनी सांगितले की, अजून विद्यार्थी आणि नागरिक असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. बांगलादेशमध्ये15 विद्यार्थी कुठे आहेत हे जाहीरपणे सांगणे योग्य नाही. त्यांना सुखरूप आणण्यासाठी  सरकारने प्रयत्न करावेत.त्यांच्या सुटकेसाठी माझी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. 


भारतीय दूतावासातील 190 कर्मचारी परतले


दरम्यान, भारतीय दूतावासातील 190 कर्मचारी बांगलादेशातून परतले आहेत. वृत्तानुसार, ढाकामध्ये अजूनही 20 ते 30 कर्मचारी आहेत. हिंसाचारामुळे बांगलादेशचे 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे गेल्या 15 दिवसांत 75 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वस्त्रोद्योगाला सर्वाधिक 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो आजपासून ढाक्यासाठी विमानसेवा सुरू करणार


दुसरीकडे, एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो बुधवारी दिल्ली ते ढाका त्यांची नियोजित उड्डाणे चालवतील. बांगलादेशच्या राजधानीतून लोकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाही विशेष विमान पाठवू शकते.


हसिना सरकारमधील अनेक मंत्री बांगलादेश सोडून गेले


डेली स्टारच्या वृत्तानुसार, हसीनाच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेले मोहिबुल हसन चौधरी आणि ग्रामीण विकास मंत्री मोहम्मद ताजुल इस्लाम कुटुंबातील अनेक सदस्यांसह देश सोडून पळून गेले आहेत. वृत्तपत्रातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री अबुल हसन महमूद अली, क्रीडा मंत्री नजमुल हसन पापोन आणि ढाका दक्षिण शहर कॉर्पोरेशनचे महापौर शेख फझले नूर तपोश, मुन्शीगंज-3च्या माजी खासदार मृणाल कांती दास आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बदरूज्जमान यांनीही देश सोडला आहे. 


हसीना सध्या भारतातच राहणार


बंगाली वृत्तपत्र डेली सनच्या वृत्तानुसार, भारताने तात्काळ शेख हसीना यांना देशात राहण्याची परवानगी दिली आहे. हसीनाने ब्रिटनमध्ये राजनैतिक आश्रय मागितला आहे. शेख हसीना यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावर ब्रिटनने सध्या मौन पाळले आहे. तिथून परवानगी मिळताच त्या भारत सोडणार आहेत. हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण रिहाना सुद्धा आहेत. ज्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. हसीना यांची भाची आणि रिहाना यांची मुलगी ट्यूलिप सिद्दीक या लेबर पार्टीच्या खासदार आहेत.


सोमवारी झालेल्या आंदोलनात 135 जणांचा मृत्यू झाला


बंगाली वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनच्या मते, सोमवारी झालेल्या निदर्शनांमध्ये किमान 135 लोक मारले गेले. रुग्णालयांनी 78 मृत्यूची पुष्टी केली. याआधी रविवारी झालेल्या आंदोलनात सुमारे 100 जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, बांगलादेशमध्ये हसीनांचा पक्ष अवामी लीग आणि त्यांच्या मित्रपक्षांशी संबंधित सुमारे 29 नेते मारले गेले आहेत. बांगलादेशी अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही जमावाने बेदम मारहाण केली. सलीम हे अवामी लीग पक्षाशी संबंधित होते.


बांगलादेशातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिफारशीनंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शेजारील देशात हिंसाचार सुरू असताना शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेश सोडला. त्या लष्करी विमानाने भारतात आली. सध्या त्यांना सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या