Kolhapur News : लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी महायुतीची नेते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असतानाच महायुतीला जबर हादरा बसला आहे. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुद्धा कोल्हापूरमध्ये झटका बसला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन पक्षांना एकाच वेळी तगडा झटका बसल्याने महायुतीसमोरील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आव्हाे वाढली आहेत. 


ए. वाय. पाटलांचा पक्षाला रामराम 


गेल्या काही दिवसांपासून ए वाय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्यामध्ये अजित पवार गटाला यश आलेलं नाही. पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे सुद्धा लक्ष आहे. मात्र त्यांचे मेहुणे बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के माजी आमदार के पी पाटील सुद्धा याच मतदारसंघातून इच्छुक असल्याने कोणाला संधी मिळणार आणि कोणाला शब्द दिला जाणार याकडे सुद्धा लक्ष आहे. 


भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंचा राजीनामा 


दुसरीकडे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा याच विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राहुल देसाई यांना सुद्धा उमेदवारीची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोन्ही नेते महाविकास आघाडीच्या मार्गावर गेल्यास महाविकास आघाडीमध्ये या नेत्यांना कोणत्या पद्धतीने सामावून घेतलं जातं आणि कोणता शब्द दिला जातो याकडे लक्ष असेल. 


समरजिसिंह घाटगे सुद्धा भाजपला रामराम करण्याच्या तयारीत


दुसरीकडे भाजप नेते समरजिसिंह घाटगे सुद्धा भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जोरदार कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये रंगली आहे. कागलमधून वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कागलमध्ये घाटगे काय करणार याची चर्चा होती. घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर शरद पवार यांनी स्वतः दोन वेळा संपर्क साधल्याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या