कोल्हापूर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्यापासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली सुंदोपसुंदी आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता उद्या (9 जानेवारी) आणि परवा असा दोन दिवस दौरा असणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दौऱ्याची माहिती दिली आहे.
दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला विजय देवणे यांच्यासह शहराध्यक्ष सुनील मोदी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. नियोजित दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शहरात आणि हातकणंगले मतदारसंघात अशा दोन जाहीर सभा होणार आहेत.
असा असेल दौरा (Aaditya Thackeray in Kolhapur)
उद्या दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते गारगोटीला रवाना होतील. दुपारी 3 वाजता हुतात्मा क्रांती चौक गारगोटीत जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकीट कोल्हापुरात जाहीर सभा होईल. त्यानंतर कोल्हापुरात मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी बुधवारी यशवंत मंगल कार्यालय, हुपरी येथे मेळावा होईल.
मुरलीधर जाधवांची उचलबांगडी
आदित्य ठाकरे यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का? याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती. यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्याने हा वाद मिटवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का? याचीही चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडणार असल्याची चर्चा आहे. बदल्यात विधानसभेचा पैरा असा हा राजकीय डाव असू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पडले. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेची भिस्त माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर येऊन पडली आहे.
राज्यसभा निवडणुकीपासून कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांना पायघड्या घालूनही नकार दिल्यानंतर संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला होता. मात्र, स्वकीयांनी घात केल्याने संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला. ही पक्षात पडलेली पहिली ठिणगी होती. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेना पूर्णत: फुटली.
मागील दौऱ्यात आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत
शिवसेना फुटल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मागील शिवसंवाद यात्रेत कोणताही मातब्बर नेता नसताना आदित्य यांच्या स्वागताला झालेली गर्दी ही लक्षवेधी होती. आदित्य ठाकरे यांनी देखील आपला ताफा थांबवून तमाम शिवसैनिकांची तसेच नागरिकांची भेट घेतली होती. प्रत्येक पाच किलोमीटरवर गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याच्या दोन्ही बाजूला शेकडो दुचाकीस्वार हातात भगवा झेंडा घेऊन ताफ्यात सहभागी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या