Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा परिसरात ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच दुर्मीळ प्रजातीचा तस्कर साप (Trinket) आढळून आला आहे. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या डॉ. अमित पाटील यांनी या दुर्मिळ साप शोधला आहे. चार ते साडे चार फूट लांबीचा आणि एक ते सव्वा इंच जाडीचा पूर्ण वाढ झालेला हा साप त्यांनी पकडला. मात्र, नेहमी आढळणाऱ्या सामान्य तस्कर (Common Trinket) सापापेक्षा या सापाचा रंग जास्त गडद व डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले. उत्सुकता ताणल्याने त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून फारसे काही हाती लागले नाही.

Continues below advertisement


त्यामुळे पाटील यांनी राधानगरीच्या सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी व कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवून पुढील अभ्यास केला. डॉ. गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी पाठविलेल्या विविध फोटोंच्या आधारे निदान करून हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप (Montane's Trinket) असल्याचे व हा अतिशय दुर्मीळ व सहजासहजी न आढळणारा साप असल्याचे सांगितले. या मॉण्टेन प्रजातीतही डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांनुसार सहा प्रकार असून त्यातील नव्याने आढळलेल्या तिसऱ्या उपप्रकारातील हा साप असल्याचे तज्ज्ञांनी कळविले आहे. डॉ. वरद गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी सापांच्या केलेल्या अभ्यासाबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे.


धोक्याची जाणीव होताच हल्ल्याचा पवित्रा घेतो 


तस्कर हा साप अतिशय उजळ रंगाचा असून देखणा असतो. हा साप धोक्याची जाणीव होताच हल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेतो आणि नागासारखा असल्याचे भासवतो. हा शक्यतो दाट जंगलात वाळवीच्या बिळांमध्ये राहतो आणि उंदीर, सरडे, पाली, लहान पक्षी यांना खाद्य बनवितो. याला पकडून बंदिस्त जागी ठेवलेले आवडत नाही आणि वारंवार त्रास दिल्यास जोरात चावा घेतो; मित्र हा बिनविषारी साप असून यापासून माणसाला कोणताही धोका नसतो. मॉण्टेनचा तस्कर साप हा शक्यतो गडद तपकिरी रंगाचा असून त्याच्या डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांचा वेगळी संगती हा त्याला सामान्य तस्कर सापापासून विलग करतो.


गगनबावडा परिसर हा केवळ निसर्गसंपन्नच नाही तर विविध प्रकारच्या सापांचेही आगर आहे. डॉ. पाटील यांना गगनबावडा परिसरात मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, बेडॉम्स कॅट स्नेक, फ्रॉर्स्टेन्स कॅट स्नेक, वोल्फ स्नेक, हिरवा नाग म्हणून ओळखला जाणारा ग्रीन किलबॅक, चेकर्ड किलबॅक, बफ स्ट्राईप्ड किलबॅक, खापरखवल्या, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण अशा बऱ्याच प्रजातींचे साप मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. 


बिनविषारी किंवा विषारी सापांना मारून निसर्गाची ही संपन्न परिसंस्था बिघडवली जाऊ नये यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. डॉक्टर अमित सुमन तुकाराम पाटील हे महाराष्ट्राचे माझी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे भाचे आहेत. वन्यजीव क्षेत्रांत अभ्यास व निरीक्षण ते सतत करत असतात.


इतर महत्वाच्या बातम्या