Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वर्गात जात असताना सोबत मोबाईल घेऊन जाऊ नये, असे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी काढले आहे. शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या या पत्राची शिक्षण वर्तुळात जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी दिल्यानंतर त्यांना काही गोष्टी जाणवल्या. त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या, मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मोबाईल सोबत ठेवल्यास अध्ययनामध्ये परिणाम होतो, शिवाय अन्य घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षकांनी शिकवण्यासाठी वर्गात जात असताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करायचा आहे. विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी मोबाईल आवश्यक असेल, तर त्याची नोंद टाचण वहीत करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय कोणताही शिक्षक मोबाईल वापरणार नाही, असाही उल्लेख शिक्षणाधिकार्यांनी पत्रामध्ये केला आहे. या सर्व नियमांची माहिती शिक्षकांनी पालक मिटींगला देणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्षक जास्त वेळ मोबाईलवर वेळ घालवत असेल, तर विद्यार्थ्यांनी काय शिकायचं? हा देखील प्रश्न उपस्थित होतो.
काय म्हटलं आहे पत्रात?
मुख्याध्यापक व शिक्षकांना वर्गामध्ये भ्रमणध्वनी (मोबाईल) नेण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून भ्रमणध्वनीचा वापर शिक्षक करणार असेल, तर तशा प्रकारची दैनिक टाचणमध्ये नोंद असावी. कोणत्या घटकासाठी, संकल्पनेसाठी कोणता व्हिडिओ दाखवणार आणि किती वेळेचा व्हिडिओ दाखवणार याबाबत दैनिक टाचणामध्ये सविस्तर नोंद असावी. मुख्याध्यापकांनी खात्री करून परवानगी दिल्यानंतरच त्या तासिकेपुरताच वर्गामध्ये भ्रमणध्वनी शिक्षक घेऊन जातील. शिक्षकांनी तासिका संपल्यानंतर परत भ्रमणध्वनी मुख्याध्यापकांकडे जमा करावा. मुख्याध्यापकांनी शाळेच्या कार्यालयामध्ये सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी जमा करावेत.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्राचे शाळा व्यवस्थापनाने काटेकोरपणे पालन केल्यास शिकवणीमध्ये आणि शिक्षणाच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल यात शंका नाही. घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षकाची जागा मोबाईल कधीच घेऊ शकत नाही
दरम्यान, काही दिवसांपासून शाळांमध्ये होत असलेल्या स्मार्टफोन्स वापरावर युनेस्कोकडून गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. शिक्षकाची जागा मोबाईल कधीच घेऊ शकत नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कोलंबियापासून आयव्हरी कोस्टपर्यंत आणि इटलीपासून नेदरलँडपर्यंत जगातील प्रत्येक चौथ्या देशाने शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे. त्याचवेळी फ्रान्स आणि डेन्मार्क या दोन्ही देशांनी Google Workspace वरही बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश आणि सिंगापूरने वर्गात स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या