Kolhapur News :  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील धामणी नदीवरील (Dhamani River) बळपवाडी ते पाटीलवाडी दरम्यान शेतकऱ्यांनी घातलेला मातीचा बंधारा (Dhamani Bandhara) वाहून गेला आहे. पाण्याच्या प्रचंड आलेल्या दाबामुळे आज सकाळी 7 वाजता हा बंधारा  वाहून गेला. त्यामुळे नजीक असणाऱ्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बंधारा फुटण्याला पाटबंधारे विभाग पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.


धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम 


दरम्यान, म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालण्याचे काम करत आहेत. धामणी नदीवर 9 ठिकाणी असे बंधारे घालण्याचे काम सुरू आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असे मातीचे बंधारे येथे दरवर्षी घातले जातात. राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात धामणी नदी कोरडी पडते. येथे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे चौके ते पनोरेपर्यंत नऊ ठिकाणी धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. यासाठी लाखो रुपये शेतकरी स्वतः जमा करतात. 


जेसीबीच्या सहाय्याने 5 दिवस स्वतः राबून असे बंधारे घातले जातात. परिसरात उसासह अन्य पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर धामणी नदी चार महिने दुथडी भरून वाहते. मात्र मेमध्ये धामणी नदी कोरडी पडते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी लाखो रुपये स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. 


कोल्हापूर पद्धतीतील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम 3 महिन्यातच गेले वाहून


दरम्यान, म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मे महिन्याच्या अखेरीस केलेली दुरुस्ती पावसाळ्यातील अवघ्या दोन-तीन महिन्यातच वाहून गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात मातीचा बांध घालताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. 


संबंधित सर्वच बंधाऱ्याच्या कामाची तसेच अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यात गेल्या 22 वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धामणी खोऱ्यात कोनोली- शेळोशी, म्हासुर्ली - चौधरवाडी, भित्तमवाडी - गवशी, पणोरे - हरपवडे, आंबर्डे - वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर 25 ते 40 वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. मात्र, बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अपेक्षित पाणीसाठा होत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या