Kolhapur News : शासकीय रुग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांनी गरोदर मातांच्या घरोघरी जाऊन ज्या मातांची प्रसुतीची अपेक्षित तारीख जवळ आली आहे, अशा मातांना शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुतीकरीता प्रवृत्त करा. याकरीता डॉक्टर व नर्सेस यांनी मुख्यालयामध्ये राहून गरोदर मातांना चांगल्या आरोग्य सेवा द्याव्यात, अशा सूचना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या.


प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आरोग्य समितीची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सर्व कार्यक्रम अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  चव्हाण यांनी जिल्ह्यात सिझेरीयनचे प्रमाण 31 टक्के असून शासकीय संस्थांतील प्रसुतीचे प्रमाण 21 टक्के असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन द्या. शासकीय रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण वाढत असले, तरीही या प्रमाणात अपेक्षित वाढ होत नाही, त्याकरीता आरसीएच पोर्टलवरील जिल्ह्याचे रँकिंग वाढविण्यासाठी गरोदर मातांची आरसीएच पोर्टलवर गरोदर मातांची नोंदणी अद्यावत करण्याबाबत सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


गोवर-रुबेला क्वारंटाईन मोहिमेबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, या मोहिमेची पूर्ण तयारी करा. त्याकरिता प्रथम सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करा. तसेच लसीकरणासाठी उपलब्ध साधनसामग्री व लसींचा आढावा घ्या. या मोहिमेदरम्यान 100 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण होईल, याची दक्षता घ्या. याकरीता 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील वंचित लाभार्थ्यांची लाईन लिस्ट अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या.


जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कौटुंबिक कुष्ठरोग रुग्णांत होणारी वाढ चिंताजनक आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे महत्व जाणून योग्य पद्धतीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी दिल्या.


यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जोशी यांनी गोवर रुबेला दुरीकरण मोहिमेचा पहिला टप्पा दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 व दुसरा टप्पा 15 ते 25 जानेवारी 2023 असल्याबाबतची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी ज्या भागात मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत त्या भागातील डासांची घनता तपासणे, कंटेनर, इंडेक्स तपासणे आदी बाबींनी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.


इतर महत्वाच्या बातम्या