कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यामध्ये अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राज्यात सर्वाधिक चुरशीने मतदान पार पडले. काल सात मे रोजी झालेल्या मतदानामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 71 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यांमध्ये 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. त्यामुळे अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये कोण बाजी मारणार? याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार असलं तरी आतापासूनच आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होती ती आता शांत झाली आहे. आता कट्ट्या कट्ट्यांवर कोण जिंकणार, कोण किती मताधिक्य घेणार? कागलमध्ये काय होणार? करवीरमध्ये काय होणार? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. या चर्चा होत राहणार असल्या, तरी अंतिम निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर लोकसभेला कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चंदगड, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी- भुदरगड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 78.89 टक्के मतदानाची नोंद करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे, तर सर्वात कमी मतदानाची नोंद कोल्हापूर उत्तरमध्ये झाली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल हा संजय मंडलिक यांचा बालेकिल्ला समजला जातो. कागलमध्ये सर्वाधिक गटाचे राजकारण केले जातं. या मतदारसंघांमध्ये संजय मंडलिक हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची ताकद असल्याने त्या ठिकाणी सर्वाधिक चुरशीने मतदानाची अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणी करवीरच्या तुलनेत पाच टक्के कमी मतदान झालं असून कागलमध्ये 73.80 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार पी एन पाटील नेतृत्व करत असून, संजय मंडलिक यांच्यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या ताकद लावली होती. त्याचा परिणाम मतदानामध्ये पण दिसून आला असून 78.89 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर शहर आणि उपनगरे सामावली गेली असून आणि नजीकची खेडी सुद्धा या दोन्ही मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले.
कोल्हापूर उत्तर मध्ये 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली, तर कोल्हापूर दक्षिण मध्ये 69.80 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये दुपारच्या सत्रामध्ये कमी मतदान झालं होतं. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा एकदा मतदानाचा वेग वाढल्याने 65 टक्क्यांच्या घरामध्ये मतदान पोहोचलं.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाचा आमदार?
राधानगरी मतदारसंघांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मतदानासाठी प्रतिसाद थंडा प्रतिसाद दिसून आला. मात्र, दुपारच्या सत्रामध्ये मतदान वाढल्याने राधानगरी भुदरगड मतदारसंघातील एकूण मतदान 66.68 टक्के झालं आहे. मतदारसंघ निहाय विचार करता चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत. करवीरमध्ये काँग्रेसचे पी. एन. पाटील आमदार आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव काँग्रेसच्या आमदार आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार आहेत, तर राधानगरी-भुदरगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. त्यामुळे या विद्यमान आमदारांनी आपापल्या उमेदवारांसाठी किती ताकद लावली आहे आणि त्याचं मताधिक्य कोण किती देणार? याचं उत्तर चार जून रोजी स्पष्ट होणार आहे.
दोन्हीकडून ताकदीने प्रचार
कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकारणाचा कल बदलून गेला होता. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार होते. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या एक महिन्यात तब्बल चार वेळा कोल्हापूरचा दौरा करत कोल्हापूर आणि हातकणंले या दोन्ही मतदारसंघांसाठी जोडण्या केल्या. कोल्हापुरातील आजी-माजी नगरसेवक, साखर कारखाने, गोकुळ ते सहकारी संस्थापर्यंत अनेकांशी थेट संपर्क साधत संजय मंडलिक यांच्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे या सर्व जोडण्याचा परिणाम किती होतो हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे शाहू महाराजांच्या प्रचाराची संपूर्णतः जबाबदारी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याच खांद्यावर होती. शिवशाहू निर्धार सभा गांधी मैदानात शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली. या सभेसाठी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार केला आहे. कोल्हापूरसाठी छत्रपती शाहू घराणे हा अत्यंत नाजूक मुद्दा असल्याने त्याचा प्रभाव मतदानामध्ये दिसून आल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या