कोल्हापूर: सध्या जिथं लावणीचा ऊस तुटलाय, तिथं खोडवा ऊस लागवडीची तयारी सुरु आहे.  खोडवा ऊसाला खताचा वेळेवर हप्ता दिला तर लावणीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळतं, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र हे खत देण्यासाठी शेतकऱ्यांनाही बरीच मेहनत करावी लागते. मजुरांची समस्या भेडसावते. ही मेहनत वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या एका शेतकऱ्यानं एक यंत्र तयार केलं आहे.


दातेरी चाकं असणारं हे नवं यंत्र नाही तर पॉवर ट्रेलरच आहे. कोल्हापुरातील मिलिंद पाटील या तरुण शेतकऱ्यानं हे तयार केलं आहे. खोडवा ऊसाला खतं द्यायचं कामं हे यंत्र अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात करतं.

खोडवा ऊसापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याला वेळेवर खतं देणं गरजेचं असतं. पारंपरिक पद्धतीत पहारीच्या मदतीनं ऊसाच्या बुडख्याजवळ खड्डा करुन खतं दिली जातात. यामध्ये वेळ आणि पैसा जातो. शिवाय ग्रामिण भागात मजुरांची समस्या ठरलेलीच. यावर मात करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रीच्या मिलिंद पाटील या एक नामी शक्कल लढवली आणि पॉवर ट्रेलरलाच ही दातेरी चाकं जोडली.

या एका चाकाच वजन ३५ किलो असून यावर बसविलेल्या पहार पद्धतीच्या कोनाची उंची ४ इंच आणि रुंदी २ इंच आहे.एका चाकावर आठ पहारीच्या  आकाराचे कोन असून एक चाकाचा फेरा पूर्ण झाल्यानंतर जमिनीत आठ नाळे किंवा होल पडतात. आणि ऊसाला सहजरित्या खत देता येतं.

खोडवा ऊसाला खत देण्यासाठी मिलिंद यांच्या पत्नीला मजूर शोधण्यासाठी मोठा त्रास व्हायचा. मजूर मिळाले तरी पाहिजे तसं काम होईलच असं नाही..मजुरीची खर्चही भरमसाठ होता..मात्र या यंत्राच्या निर्मितीनंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.

हे यंत्र बनवण्यासाठी मिलिंद यांना 5 हजार रुपये खर्च आला आहे. अवघ्या 2 तासात या यंत्राद्वारे एका एकरावरील खोडवा ऊसाला खत देता येतं.  यासाठी फक्त 2 लिटर डिझेल लागतं, म्हणजेच एकरी फक्त 120 रुपये खर्च.

पावणेचार फुटांच्या सरीतील खोडवा ऊसाला खत देण्यासाठी हे यंत्र बनवलं गेलंय. मात्र शेतकरी त्यांच्या गरजेनुसार या यंत्रात बदलही करु शकतात.

कष्ट, पैसा आणि वेळ हे यांत्रिकीकरणामुळं वाचतात. हेच यांत्रिकीकरण मिलिंद यांनी अंगिकारलं. आणि घराच्याच वस्तूपासून यंत्राची निर्मिती केली. हे यंत्र आता पंचक्रोशीतील शेतकऱ्यात फेमस होतंय.