गोवा : पर्यटनाच्या आडून ड्रग्सचा फैलाव गोव्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच हणजुणे येथे हैदराबादच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शशांक शर्मा असं मृत तरुणाचं नाव आहे.


 पर्यटन हंगामाला सुरुवात होताच ड्रग्स माफियांनी देखील आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केल्याचं हणजुणे येथील घटनेनंतर स्पष्ट झालं आहे.


शशांक शर्मा आपल्या मित्रांसोबत हैदराबाद येथून जीवाचा गोवा करण्यासाठी आला होता. शनिवारी हणजुणे येथील एका क्लबमधून डिस्को पार्टी करून आल्यानंतर त्याला अस्वथ्य वाटू लागलं होतं. त्याला तातडीने बांबोळी येथील गोमेकॉमध्ये हलवण्यात आलं. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


गोव्यातील किनारी भागात ड्रग्स माफियांचं जाळं आहे. ड्रग्स पेडलर्स गोव्यात पर्यटक म्हणून येणाऱ्यांना हेरुन आपला धंदा करत असतात. पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच ड्रग्स माफिया सुसाट सुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


सत्तरी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय कॅटामाईन रॅकेटचा पर्दाफाश केंद्रीय संस्थानी केला होता. गोवा पोलीस छोटे-मोठे ड्रग्स पेडलर्स पकडतात, मात्र ड्रग्स माफिया अद्याप देखील पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.