भारतात पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा देशी गायींच्या संवर्धनासाठी वापर केला जात आहे. प्रसिद्ध उद्योपती आणि रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या जेके ट्रस्ट यांच्यावतीने इंदापूरच्या रज्जाक खान यांच्या रचना गोशाळेत हा प्रयोग सुरु आहे.
जातिवंत देशी गायींचा सांभाळ करणारं हे पठाण कुटुंब, गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांची ही सेवा अविरत सुरु आहे. खिलार गायीवरील त्यांचं काम विशेष आहे. रचना फार्ममधील खिलार आज दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देते, त्यामुळेच खिलारवरील टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग इथे होत आहे. यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सुदृढ अशा खिलारच्या गायींचं स्त्री बीज आणि जातीवंत खिलार बैलाचे शुक्राणू इथे जमा केले जात आहेत. या दोन्हींचा प्रयोगशाळेत संयोग केला जाईल आणि यापासून तयार झालेला अॅबिओ हा इतर खिलार गायींच्या गर्भाशयात सोडला जाईल, जिथे नव्या जीवनाची रेषा तयार होते.
हा अॅबिओ लिक्विंड नायट्रोजनमध्ये तब्बल 200 वर्षांपर्यंत जिवंत राहतो, त्यामुळे आवश्यक तेव्हा गायींच्या प्रजननासाठी याचा वापर होऊ शकतो.
जिथे एक गाय वर्षाकाठी एका पिलाला जन्म देते, तिथेच सुदृढ गायीपासून 200 जातीवंत खिलार पिलांचा जन्म होऊ शकतो. टेस्ट ट्यूब बेबीचा खिलारवरील प्रयोग प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र यापूर्वीचे अनुभव पाहता हा यशस्वीच होईल असं तज्ज्ञांना वाटत आहे.
महाराष्ट्राची शान असणारी उंचपुरी आणि गोरीगोमटी खिलार, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात खिलार बैलाची जोडी दिसायची. मात्र तंत्रज्ञानाचा विकास, शर्यतीवरील बंदी यामुळे हा गोवंश दिसेनाशा झाला. रज्जाक आणि माजिद पठाण गोसंवर्धनाच्या तपश्चर्येला या प्रयोगामुळे बळ मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ