Kaustubh Dhavase : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने धवसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या अकरा वर्षांपासून धवसे फडणवीसांचे विश्वासू अधिकारी म्हणून मानले जातात. यापूर्वी धवसे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती. मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची आता नियुक्ती झाल्याने नवी जवाबदारी त्यांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अधिकारी कौस्तुभ धवसे नेमके कोण?
प्रशासनातील तज्ज्ञांची वाढती भूमिका अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील आदेशानुसार कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्रांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण (Chief Advisor – Investments and Strategy) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते 2014 पासून मुख्यमंत्री यांचे सहसचिव व विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत असलेल्या धवसे यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, जागतिक गुंतवणूक, तंत्रज्ञान धोरण आणि संस्थात्मक भागीदारी यासारख्या अनेक दूरदृष्टीच्या उपक्रमांच्या रचनेत मोलाची भूमिका बजावली आहे.
दादरमध्ये जन्मलेले आणि अंधेरीत वाढलेले धवसे हे डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर असून, एस.पी. जैन संस्थेतून पीजीडीएम आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून पब्लिक पॉलिसी डिग्री प्राप्त केलेली आहे.
महाराष्ट्र शासनात पारंपरिक नोकरशाहीबाहेरून (lateral entry) आलेल्या धवसे यांनी 2014 पासून वरिष्ठ पदांवर सेवा बजावली असून, त्यांची ही नियुक्ती अशा व्यावसायिकाची प्रशासकीय शिखरापर्यंत झालेली दुर्मिळ आणि प्रभावी वाटचाल आहे. हे पद राज्य सरकारच्या प्रशासनात अशा गैर-सेवा तज्ज्ञाने गाठलेले सर्वोच्च स्तर मानले जात आहे.
मागील दशकभरात धवसे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाच्या अजेंड्याला आकार देताना खालील प्रमुख उपक्रमांमध्ये नेतृत्व केले आहे:
1.महाराष्ट्राला भारतातील आघाडीचे थेट विदेशी गुंतवणूक (FDI) केंद्र म्हणून प्रतिष्ठित करणे.
2. फिनटेक, डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर्स, लॉजिस्टिक्स आणि AI क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणूक पुढे नेणे.
3. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचे नेतृत्व करणे आणि ₹1.8 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना गती देणे.
नवीन पदनामांतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रात राज्याची गुंतवणूक धोरणे, एफडीआय सुलभता, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख उपक्रम, जागतिक भागीदारी आणि मुख्यमंत्री वॉर रूमचे नेतृत्व यांचा समावेश आहे. ही नेमणूक महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक प्रशासन, विकास आणि धोरणनिर्मितीत कार्यक्षम व्यावसायिकांना सामावून घेण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक मानली जात आहे.
या उन्नतीसह, कौस्तुभ धवसे हे भारतीय सार्वजनिक प्रशासनाच्या पुनर्रचनेत योगदान देणाऱ्या निवडक पार्श्वभूमीतील नेत्यांच्या विशिष्ट गटात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी प्रचिती असलेले धावसे आता नव्या पदावर कशी कामगिरी करतील यावर लक्ष असणार आहे.
हे ही वाचा