नागपूरः यावर्षी मान्सूनचे उशीरा आमगन झाले असले तरी, पावसाळ्याच्या दोन महिन्यात आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी जुलै महिन्यात सर्वाधिकवेळा अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. मागील 10 वर्षांच्या मान्सूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै अखेरपर्यंत साधारणः 400 मिमी पावसाची नोंद केली जाते. यंदा मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. नागपूर शहरात आतापर्यंत 746.9 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एवढाच पाऊस जिल्ह्यातही नोंदविण्यात आला आहे. जो सरासरी जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाच्या 300 मिमी अधिक आहे. जून महिन्याच्या अखेरीस 119 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुलै या एकाच महिन्यात 627 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.
यापूर्वी 1994मध्ये 678.9 मिमी ची नोंद
जुलै महिन्यात मान्सून मधील सर्वाधिक पाऊस पडतो. या महिन्यात पावसाची सरासरी 313.7 मिमी पाऊस पडतो. दर दिवशी 10 ते 30 मिमी सरासरी पाऊस होते. तर एक दोन दिवसांचा संततधार पावसाची नोंदही होते. बंगालच्या खाडीत उत्तर पश्चिमेकडे दाब वाढल्याने मध्यभारतात पावसाची नोंद होते. साधारणतः जुलै महिन्यात 14 दिवस पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै महिन्यातील सर्वच रेकॉर्ड तुटले असून सर्वच दिवस पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाच्या दिवसाची नोंद सर्वाधिक झाली. यापूर्वी 678.9 मिमी पावसाची नोंद 1994 साली करण्यात आली होती. 2008 साली महिन्याभरात सर्वात कमी 82 मिमी पाऊस नोंदविण्यात आला होता.
ओल्या दुष्काळाची स्थिती
जुलै महिन्यात संततधार पावसामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नदी नाल्यांना अनेकदा पूर गेले आहेत. खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान नोंदविण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खरीप पीक 90 टक्के खराब झाले. पुरात वाहून गेल्याने सुमारे 11 लोकांचा जीव गेला. 70 हून अधिक जनावरे दगावली आहेत. घरांचे नुकसान झाले तर अनेक रस्ते व पूल पाण्यामुळे वाहून गेले. जुलै महिन्यात झालेल्या अती पावसामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.