Beed News : महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नव्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत संशयित दहा ते बारा जणांची चौकशी केली. चौकशीत एका महिलेचा देखील समावेश आहे. तर मकोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गोट्या गित्तेच्या अटकेसाठी यापूर्वीच तीन पथक रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान याच मुद्द्यवरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल मुख्यामंत्र्याची भेट घेतली आणि आज लगेच 4 संशयित आरोपींची धरपकड करण्यात येतेय, याचाच अर्थ हि कारवाई आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबावामुळे होत नव्हती का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे काल मुख्यामंत्र्याना भेटल्या, आज लगेच आरोपींची धरपकड
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 20 महिन्यांपूर्वी निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशातच काल (31 जुलै) ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज (1 ऑगस्ट) सकाळी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती समजते आहे. काल महादेव मुंडे यांच्या पत्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या आणि आज लगेच आरोपींची धरपकड देखील करण्यात आली. याचाच अर्थ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर असणाऱ्या दबावामुळेच या प्रकरणात कारवाई करण्यात येत नव्हती..! मात्र आता महादेव मुंडे यांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा आता वाटत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या