Prithviraj Chavan: मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या (Malegaon Blast Case) कालच्या निकालानंतर, काँग्रेस पक्षाने तयार केलेलं 'हिंदू टेरर' आणि 'भगवा आतंकवाद' अशा प्रकारचं नरेटिव्ह आता पूर्णपणे बस्ट झालं आहे. वोट बँकेच्या राजकारणासाठी हे शब्द तयार केले होते. इस्लामिक दहशतवादाच्या चर्चेच्या काळात हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं हे षडयंत्र होतं. हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांवर दबाव आणूनही त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. आता हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे. 'भगवा', 'हिंदू' किंवा 'सनातनी' यात कोणताही भेद नाही, हे सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आहेत. असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
भगवा दहशतवाद हा शब्द चुकिचाच, मात्र....
तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रत्युत्तर देत या विषयावर भाष्य केलं आहे. भगवा दहशतवाद हा शब्द वापरला, हा चुकिचाच होता. आजही तो वापरला जाऊ नये, अशी माझी भुमिका आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना तसं सांगीतल देखील आहे. मात्र भगवा, हिंदुत्व आणि सनातन हे एक नाही. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना सनातन वरती बंदी आणण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्या संदर्भात माझ्या पोलिसांनी मला हजारो पानांचे पुरावे दिले होते. त्यामुळे हे एकच आहे याला माझा पुर्ण विरोध आहे. भाजप आणि आरएसएस आल्यानंतर भगवा आला का? असेही ते म्हणाले.
जे रम्मी खेळतात त्यांनाच क्रीडा खातं देण्यात आलं- पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, अधिवेशन काळात विधिमंडळात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचे प्रकरण पुढे आलं होतं. या प्रकारानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषिमंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशातच माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.
माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात. या रमीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. मात्र मंत्री स्व:त खेळत आहे तर त्याचा राजीनामा झाला पाहिजे. पण मुख्यमंत्री हुशार आहेत जे रम्मी खेळतात त्यांनाच क्रीडा खातं देण्यात आलं, अशी टीका त्यांनी केलीय. ज्या मंत्र्यांवर आरोप झालेत त्यांना तात्काळ बाजूला केल पाहिजे, आमच्या काळात मुख्यमंत्र्यापासून राजीनामा घेतलेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या