Jamie Lever Struggle Story : स्टार किड्सना नेहमीच नेपोटिज्मच्या तराजूत तोललं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून नेपोटिज्मवरुन सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. नेहमीच असं म्हटलं जातं की, स्टार किड्सना मेहनतीशिवाय इंडस्ट्रीमध्ये काम मिळतं. आपल्या आई-वडिलांच्या नावाच्या जोरावर स्टार किड्स इंडस्ट्रीत मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकतात. पण एका स्टार किड्सकडे पाहिलं तर या सर्व चर्चा खोट्या ठरतात. आजही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत, जे प्रसिद्धीसाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्ट्रगल करताना दिसत आहेत. असंच एक नाव म्हणजे, जेमी लिव्हर (Jamie Lever). प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी.
जेमी लिव्हरने 2012 मध्ये करिअरला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेमी लिव्हर मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण जेमीला काहीतरी मोठं करायचं होतं. त्यानंतर जेमीनं स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. जेमी बॉलिवूड स्टार्सची मिमिक्रीही करते. सोशल मीडियावर तिच्या मिमिक्री व्हिडीओचा बोलबाला आहे. लोकांना जेमीची कॉमेडी, अभिनय आणि मिमिक्री खूप आवडते. जेमी खूप प्रतिभावान आहे, परंतु तरीही तिला अद्याप इंडस्ट्रीमध्ये हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे, जेमी स्टार किड आहे.
12 वर्षांनंतरही जेमी आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडतेय. लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी असल्याचा तिला अजिबात फायदा झाला नाही. ती स्वबळावर पुढे जात आहे, असं स्वतः जेमीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं. दरम्यान, आता ती आपल्या नव्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पॉप कौन' ही नवीकोरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधून जेमी झळकणार आहे.
स्टार किड असलं म्हणून सगळं आयतं चांदीच्या ताटात मिळत नाही : जेमी लीवर
जेमीने तिच्या स्ट्रगलसंदर्भात एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, "जर तुम्ही सेलिब्रिटींचं मूल असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला सर्व काही आयतं चांदीच्या ताटात मिळतं. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट्स, सिनेमे मिळतीलच असंही नाही. माझा करिअर ग्राफ हे यासाठीच उत्तम उदाहरण आहे. यामागे नशीब हे सर्वात मोठं कारण आहे, असे मी मानते. कदाचित वाट पाहणं माझ्या नशिबातच लिहिलं आहे." पुढे बोलताना जेमीनं म्हटलं होतं की, "वडील सुपरस्टार असल्याचा फायदा तिला अजिबात मिळाला नाही. कामासाठी वडिलांनी कधीही तिची कोणाकडे शिफारस केलेली नाही. तिनं जे काही काम केलं आणि तिला जे काही काम मिळालं, ते स्वबळावरच मिळालं."
मी कोणाच्या पाठबळावर नाही तर स्वबळावर करिअर बनवतेय : जेमी लीवर
जेमी म्हणाली होती की, "मी कोणाच्या पाठबळावर नाही तर स्वबळावर करिअर बनवतेय. याला मी माझी स्ट्रगल स्टोरीच म्हणेन की, उशीर झाला पण लोक माझ्या कामाची दखल घेत आहेत. मीही त्यात समाधानी आहे. अनेकांची कारकीर्द काही वर्षांतच संपते. मी अजूनही हळूहळू पुढे जात आहे."
दरम्यान, कॉमेडी आणि मिमिक्री करण्यासोबतच जेमी लीवर दोन चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिनं कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं' या चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय ती 'हाऊसफुल 4' मध्येही दिसली आहे. जेमी लीवर लवकरच 'पॉप कौन' या कॉमेडी सीरिजमध्ये दिसणार आहे. पॉप कौनचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो लोकांना खूप आवडला. ट्रेलर कॉमेडीनं भरलेला आहे. ही सीरिज 17 मार्चपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज केली जाणार आहे. जेमीला अद्याप चित्रपटांमध्ये अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. आता पॉप कौन या सीरिजमधून ती अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवू शकते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कॉमेडीचा विचार केला तर जेमीला तोड नाही. इंस्टाग्रामवर जेमीचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. जेमी म्हणजे, टॅलेंटचा खजिना. अभिनयापासून ते मिमिक्री आणि कॉमेडीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ती पारंगत आहे. आता 'पॉप कौन'मधून जेमी कोणत्या अंदाज प्रेक्षकांसमोर येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.