Fraud In Online Game: ऑनलाइन गेमचं वेड एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. जालना जिल्ह्यातील ढगी गावच्या एका तरुणाला यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या गेमच्या नादात त्यांना आपली शेती तसेच चारचाकी वाहन देखील विकावं लागलं आहे. आता तो एक टपरीवर आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. 


परमेश्वर केंद्रे या 35 वर्षीय तरुणाला कोरना काळात घर बसल्या ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला होत. या नादातून ऑनलाइन गेमवर पैसे कमावण्याची लालसा निर्माण झाली होती. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात फक्त परमेश्वरच नव्हे तर कुटुंबियांनादेखील हा त्रास सहन करावा लागत आहे. 
 


कसे गमावले पैसे?


मोस्टबेट (Mostbet) हा ऑनलाइन गेम परमेश्वर च्या आर्थिक ऱ्हासाला कारणीभूत ठरला आहे. विशेष म्हणजे हा ऑनलाइन प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. परमेश्वरने गुगल क्रोम वरून या गेमची लिंक डाउनलोड केली.  सुरुवातीला 100 रुपये नंतर 200 नंतर 500 रुपये अशी गेममध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला दीड वर्षात त्याला याचा चांगला मोबदला मिळत होता. दरम्यान या काळात त्याचं गेमचं वेड आणखी वाढत गेलं आणि शेकडोंची गुंतवणूक हजार आणि लाखांवर गेली. परतावा घटू लागला. हळूहळू परमेश्वरवर मित्रांचे कर्ज वाढलं आणि ते फेडण्यासाठी त्याने सुरुवातीला आपली चार चाकी महिंद्रा स्कार्पिओ विकली. मात्र त्यातही कर्ज फिटत नसल्याने त्याने दोन महिन्यापूर्वी एक एकर शेत देखील विकलं.


गेम मधून दुप्पट परतवा मिळण्याच्या आमिषाने परमेश्वरने दोन वर्षात 45 लाख रुपये गमावले. याच गेम मधून जिंकलेले पैसे परत मिळतील म्हणून त्याने ऑनलाइन संपर्क सुरू केला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही जिंकलेली रक्कम मिळत नसल्याने परमेश्वरचे डोळे उघडले आणि आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. 


झटपट पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेमच्या नादात आपली कष्टाची कमाई गेली हे लक्षात आल्यावर त्याने पोलीस स्टेशन गाठलं. त्याला आता सायबर पोलिसात तक्रार द्यायला सांगितली असून, सोमवारी बँक डिटेल्ससह त्याला सायबर पोलिसांनी तक्रार देण्यास सांगितलं आहे.


परमेश्वर केंद्र गेल्या दोन वर्षापासून या ऑनलाइन गेमच्या नादात अक्षरशः वेडा झाला. मात्र त्याला भानावर यायला दोन वर्षे लागली. मात्र, तोवर त्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं. आज त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एका लहानशा टपरीच्या आधारे चालवावा लागत आहे. परमेश्वरला त्याच्या झालेल्या फसवणुकीतून गमावलेला पैसा त्याला परत मिळेल का हा एक प्रश्नच आहे.