जालना: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा बसणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आगामी निडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार उभे करायचे की नाही, कोणते उमेदवार द्यायचे याबाबत चाचपणी सुरू आहे, अशातच काल(शुक्रवारी) शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. रात्री उशिरा दोघांमध्ये अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणावर एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचा योगेश केदार यांचा दावा आहे. 


मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची काल रात्री शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते  योगेश केदार यांनी भेट घेतली. दोघांमध्ये अंतरवाली सराटीत रात्री मराठा आरक्षणावर तासभर चर्चा झाली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्यातबाबत आणि मराठवाडा स्तरावरती म्हणून जरांगेंच्या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचं योगेश केदार यांनी म्हटलं आहे.


कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?


काल रात्री मनोज जरांगे यांची भेट आंतरवाली सराटीत भेट झाली, परवा 29 तारखेला मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट या मागण्या प्रमुख दोन मागण्या ठेवल्या.  आता सरकारच्या दृष्टीने करण्यायोग्य आहेत. त्या करता येतील म्हणून काल मी जरांगे यांची भेट घेतली. याबाबतची सर्व माहिती त्यांना दिली त्याचबरोबर चर्चा केली. राज्यातील हा प्रश्न सोडवायचा असेल तर  मराठवाडा गॅजेटचा प्रश्न सुटणं अत्यंत आवश्क आहे. मराठवाड्यातील मराठा आज जीवाशी खेळत आरक्षणासाठी उभा आहे, म्हणून हा प्रश्न सोडवला तर राज्यातील प्रश्न सोडवला जाईल, काल चर्चा सकारात्मक झाली. त्याची माहिती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देईन त्याचबरोबर सरकार आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधून मार्ग कसा काढता येईल याबाबत येणाऱ्या काळात माझे प्रयत्न असतील असं  योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी म्हटलं आहे. 


मनोज जरांगे मालवणच्या दिशेने रवाना


मनोज जरांगे मालवणच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या (रविवारी) ते राजकोट किल्ल्यावर भेट देणार आहेत. मनोज जरांगे आज मालवण मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी किल्ल्यावर भेट देऊन दर्शन घेणार आहेत. ज्याची चूक आहे तो त्याच दिवशी आत मध्ये पाहिजे होता, त्याच्याशी राजकीय हितसंबंध जोपासले नाही पाहिजे, याबाबत सुधारित कायदा व्हायला पाहिजे दोषींना जामीनच मिळाला नाही पाहिजे. छत्रपतीच्या नावाने राजकारण होऊ नये असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.