जालना : रावसाहेब दानवे हा काही कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाचे शल्य पुन्हा एकदा बोलून दाखवलं. अनेक महाभाग आपल्या पराभवाचे क्रेडिट घेत आहेत, पण आम्ही युतीतले माणसं असून बेइमानी करणार नाही असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांना टोला लगावला. जालन्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  


भाजपच्या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जालना विधानसभेची जागा भाजपला सोडवण्याची मागणी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागा सोडवून घेण्याच्या आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे जालना विधानभेत महायुतीत जागावाटपावरून आगामी काळात घमसान पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे. 


खोतकर-सत्तारांची दानवेंवर टीका


जालना विधानसभेच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. ज्यांनी संकटात टाकलं त्यांना कधी सोडायचं नसतं आणि त्यांच्यापासून सावध पण राहायचं असतं. आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आहे. ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं आम्हाला त्रास दिला त्याचा सत्यानाश झाला असं म्हणत अर्जुन खोतकर आणि अप्रत्यक्षरीत्या रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका केली होती.


शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. दानवेंचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कारही केला होता. 


जालन्याच्या जागेवरून दानवे-खोतकर आमने-सामने? 


जालना विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालन्याची जागा भाजपला सुटावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं सांगत या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


ही बातमी वाचा: