अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी केली जात आहे. नेत्यांकडून राज्य पिंजून काढले जात असून ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. त्यातच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबतचा रंजक किस्सा पारनेरच्या सभेत सांगितला आहे.
अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचा पराभव केल्यानंतर निलेश लंके खासदार झाले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवले. यावेळी अमित शाह यांच्या सोबत फोटो काढण्याचा किस्सा निलेश लंके यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. निलेश लंके यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश लंके?
निलेश लंके म्हणाले की, मला विधानसभेचा अनुभव होता. मी लोकसभेत पहिल्यांदाच पोहोचल्याने मी बिनधास्त होतो. माझ्यासोबत बीडचे बजरंग सोनवणे, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि कल्याण काळे होते. तेवढ्यात संसदेच्या लॉबीत अमित शाह आले, असे त्यांनी म्हटले. यावेळी निलेश लंके यांच्या सोबत असणाऱ्या काही मंडळींनी अमित शाह यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आणि अमित शाह यांना आवाज दिला. 'साहेब तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले. अमित शाह यांनी निलेश लंकेंना तत्काळ प्रतिसाद दिला आणि फोटो काढण्यासाठी बोलावले. यावेळी निलेश लंके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख करून देताना हे आपले बजरंग आप्पा, पंकजा मुंडे यांना पाडून आले. हे भास्कर भगरे, भारती पवार यांना पाडून आले, तर हे कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो, असे म्हटले. निलेश लंके यांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला होता.
अमित शाहांकडून कौतुक
यावर निलेश लंके यांनी अमित शाह त्यांना काय बोलले हे देखील सांगितले. 'खूपच डेअरिंग आहे', असे म्हणत अमित शाहांनी कौतुक केल्याचं निलेश लंकेंनी सांगितलं. यानंतर 21 लाख मतदारांमधून आलो आहोत, थोडी मागच्या दारानं आलो आहोत, असेही निलेश लंकेंनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा