जालना : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (3 मे) सकाळी शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची घरी जाऊन भेट घेतली. अर्जुन खोतकर गेल्या काही दिवसांपासून दानवे यांच्या प्रचारापासून अंतर राखून आहेत. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या होत्या. या भेटीने दोघांमधील वाद संपुष्टात आल्याच बोललं जातं असलं तरी  अर्जुन खोतकर यांनी भेटीनंतरही दोन दिवसांचा अवधी मागितल्याचे सांगत सस्पेन्स अजूनही कायम ठेवला आहे. दुसरीकडे, अर्जुन खोतकर उद्यापासून प्रचारात सक्रिय होतील, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज होऊन स्वतःला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र मतदारसंघांमध्ये आहे. आज सकाळी दानवे यांनी खोतकर यांच्या 'दर्शना' या निवासस्थानी भेट दिली. दानवे यांनी खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.


अर्जुन खोतकर भेटीनंतर काय म्हणाले?


अर्जुन खोतकर यांनी दानवे यांनी घरी येऊन भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रावसाहेब दानवे घरी आले होते. त्यांनी प्रचारामध्ये येण्याची विनंती केली आहे. मी त्यांच्याकडे दोन दिवसांचा अवधी मागितला असून वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार आहे. आमची चर्चा चांगली झाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी नाराज नाही, मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. वाशिम यवतमाळ आणि संभाजीनगरची जबाबदारी दिली आहे. पक्षाने जबाबदारी सांभाळावी लागते. या भेटीमध्ये आम्ही नाराजीवर बोललो, तसेच काय नाराजी असल्याचे त्यांना सांगितलं असून वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाईल. 


कामाच्या व्यापामुळे मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही


रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचा आणि अर्जुन खोतकरांचा कोणताही वाद नाही. राजकारणामध्ये काही राजकीय गोष्टी घडत असतात. कामाच्या व्यापामुळे मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही, आज एकत्र बसून चर्चा केली असून आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. उद्यापासून ते प्रचारात उतरणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या