जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. एकीकडे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तर, दुसरीकडे आंतरवाली सराटी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या मराठा आंदोलकांना (Maratha Protestors) पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, त्यांना अंबड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
आंतरवाली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील व जाळपोळीच्या घटनेतील आरोपींना गेल्या दोन दिवसापासून पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येत आहे. साधारण 12 ते 15 जणांना या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांच्या संदर्भाने तपासासाठी हजर राहण्याच्या सूचन या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे, एकीकडे मनोज जरांगे यांनी बैठक बोलावली असतांना, दुसरीकडे मात्र आंतरवाली सराटी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस पाठवण्यात आली असल्याचे चर्चेचा विषय बनला आहे.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये?
जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आंतरवाली सराटी प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. सदर गुन्हयाचे तपासात सबळ पुरावा उपलब्ध झालेला असुन, या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने आपणाकडे विचारपुस करुन तपास करणे असल्याने आपण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंबड जि. जालना येथे न चुकता हजर रहावे, असे पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सोबतच गुन्हा क्रमांक, गुन्ह्याची कलमं आणि हजर राहण्याची तारीख देखील नोटीसमध्ये पाहायला मिळत आहे.
आंतरवाली सराटीत आज महत्वाची बैठक...
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान 24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार यासाठी आज आंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातील मराठा आंदोलन सहभागी होणार आहे. सोबतच मराठा समाजातील वकील, डॉक्टर, अभ्यासक आणि मराठा आरक्षणाबाबत माहिती असणारे जाणकार देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत आज कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर, बैठीकाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: