जालना: ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी जालन्यातली वडगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करत असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये उपोषणामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. शरीरातील रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना मंगळवारी चक्कर येऊ लागली होती. डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र, लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही, याबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घ्यायला तयार नाहीत. केवळ मंगळवारी काल आंदोलकांच्या आग्रहामुळे लक्ष्मण हाके यांनी पाणी प्यायले. त्यामुळे त्यांचा रक्तदाब आता सामान्य पातळीवर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला ओबीसी समाजाचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ओबीसी समाजातील अनेकजण वडगोद्री येथे दाखल झाले आहेत. लक्ष्मण हाके यांची प्रकृती उपोषणाच्या सहाव्या दिवशी लक्षणीयरित्या खालावली होती. त्यामुळे ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी अंबडमध्ये बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अलीकडेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पंकजा मुंडे यांनीही उपोषणस्थळी जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती. या सगळ्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 


तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे 8 जूनपासून सुरु केलेले आपले उपोषण स्थगित केले होते. त्यांनी मराठा समाजाला सगेसोयरेच्या व्याख्येत बसणारे आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सातत्याने  मांडत आहेत. त्यांनी लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 


 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा घोटाळा: हाके


लक्ष्मण हाके यांनी राज्यात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवले आहे. हे जर खरं असेल तर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेले आहे. मग राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचे रक्षण कसे करणार, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला होता. 


आणखी वाचा


जरांगेंच्या कृतीने तुम्हाला तोंड काळं करावं लागेल, भुजबळांना टार्गेट करुन धनगरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव : लक्ष्मण हाके