अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज 15 दिवस आहे. दरम्यान. जरांगे यांचे उपोषण आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर आता आज पुन्हा सरकारमधील मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ अंतरवाली गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सरकारचं शिष्टमंडळ तिसऱ्यांदा आणि खोतकर सातव्यांदा अंतरवाली गावातील उपोषणास्थळी येणार आहे. 


अशी चर्चा होण्याची शक्यता? 


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीवार मनोज जरांगे कायम असून, मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तर, सोमवारी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याच्या ठराव घेण्यात आला आहे. सोबतच जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे इतर आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आज येणाऱ्या शिष्टमंडळाकडून सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावाची माहिती जरांगे यांना दिली जाणार आहे. तसेच, सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेल्या ठरावाचा मान राखत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती या शिष्टमंडळाकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेणार आणि जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


जरांगे दोन वाजता निर्णय घेणार...


सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा अंतरवाली गावात येणार असून, त्यांच्यासोबत जरांगे यांची चर्चा होणार आहे. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यावर आणि रात्री झालेल्या बैठकीतील ठराव पाहिल्यावर जरांगे दुपारी दोन वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. उपोषण कायम ठेवणार की मागे घेणार याबाबत देखील त्यांच्याकडून खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजता जरांगे नेमकं काय बोलणार आणि त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार यावर निर्णय होणार आहे.


जरांगे यांनी बोलावली सहकाऱ्यांची बैठक...


दरम्यान अंतरवाली गावात आज बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ तिसऱ्यांदा जरांगे यांच्या भेटीसाठी येत असताना, दुसरीकडे जरांगे यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठक आणि त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या ठरावाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील आंदोलन कसे करायचे, उपोषणाबद्दल काय भूमिका घायची याबाबत जरांगे यांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या: 


Manoj Jarange Patil : गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; आज घेणार पुढचा निर्णय