जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्याच्या मागणीबाबत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली असून, मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांशी याबाबत चर्चा केली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत तीन प्रमुख मागण्यांवर एकमत झालं आहे. त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य कराव्यात असे देखील यावेळी ठराव घेण्यात आला.
बैठकीतील तीन प्रमुख मागण्या...
पहिली मागणी : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. त्यासाठी सर्व कुणबी नोंदी शोधण्यात यावे. नोंदी सापडलेल्या त्यांच्या सर्व परिवाराला त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करण्यात यावी. असे न करता आल्यास महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अध्यादेश काढण्यात यावे.
दुसरी मागणी : मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे विना अट मागे घेण्यात यावे.
तिसरी मागणी : हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि स्वीकारण्यात यावे. सोबत 1881 चे गॅझेट,1901 ची जनगणना घ्यावी,बॉम्बे गॅझेट आणि सातारा संस्थानचे गॅझेट स्वीकारावे.
पुढील आंदोलनाची दिशा ठरणार...
मनोज जरांगे यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत तीन प्रमुख मागण्यांवर एकमत झालं आहे. त्यामुळे काही वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन पुढील मागण्या मांडतील. तसेच, या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला काही वेळ दिला जाऊ शकतो. सोबतच, सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढील आंदोलन कसे असणार याबाबत सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
फडणवीसांवर नाव न घेता टीका...
दरम्यान याच बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. "कोणीतरी म्हटलं होतं या आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. (नाव न घेता फडणवीसांवर टीका) ज्यांच्या डोक्यात होतं 10 टक्के आरक्षण दिल्यावर मराठे उड्या मारतील, पण तसं झाले नाही. त्यामुळे शहाणे असतील तर सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करावी," असे जरांगे म्हणाले आहेत.
स्वतंत्र आरक्षणाची मागणी नाही...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला. मात्र, स्वतंत्र आरक्षण देण्याची मोजक्या शंभर दीडशे लोकांची मागणी असून, कोट्यवधी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहेत. त्यामुळे सरकराने सगेसोयरे अध्यादेशाप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे असेही जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही - मनोज जरांगे