जालना : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणीच्या मागणीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही' असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “पुन्हा-पुन्हा जाणून बुजून सरकारने उपोषणाची, आंदोलनाची वेळ आणली आहे. सरकारला जे अपेक्षित होत ते झाले नाही. सरकारने आणखी शहाणे झाले पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान बैठक होणार  असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.  


मुख्यमंत्र्यांची शपथ अपूर्ण आहे असे मान्य करावे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता, विश्वासघात होऊ नये असे त्यांनी वागावे, शेवटी समाज महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांची शपथ अपूर्ण आहे असे मान्य करावे. मला यात राजकारण करायचे नाही, सत्ताधाऱ्यांकडुन ही नाही आणि विरोधकांकडुन नाही. मराठा समाजाच्या तरुणांवर फुकट दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. सगेसोयरे प्रमाणे आरक्षण दिले असते तर समाज खुश झाला असता. पण समाज नाराज आहे. कालच्या अधिवेशनात दोन्ही आरक्षण दिले असते, तर 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


पुढील आंदोलन टप्प्या टप्प्यात 


समोरच्याचा किंवा सत्ताधाऱ्यांचा फायदा असेल म्हणून एकमताने स्वतंत्र आरक्षण मंजूर झालं. ज्या आमदारांना बोलू दिले नाही म्हणतात, त्यांनी सगेसोयऱ्याबद्दल पत्र काढले का?, असेल तर आम्हाला दाखवावे. आम्हाला तेच आरक्षण हवे आहेत. त्यासाठी पुढील आंदोलन टप्प्या टप्प्यात होतील, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे उपचार घेणार...


मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या आणि सगेसोयरे अध्यादेशाची मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 12 वा दिवस आहे. दरम्यान, उपोषण सुरु असतांना त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने उपचार सुरु होते. मात्र, कालच्या अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. परंतु, न्यायालयाचे अवमान करणार नसल्याचे म्हणत पुन्हा उपचार घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मनोज जरांगेंनी आज बोलावली निर्णायक बैठक; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार; सरकारच्या अडचणी वाढणार