Manoj Jarange Protest : जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे. यावेळी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर जालना पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाची वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 


राज्य परिवहन मंडळाच्या अंबड आगाराचे बस क्र.1822 अंबड- रामसगाव मुक्काम करून परत येत होती. यावेळी सकाळी 06.30 ते 07.00 वाजे दरम्यान तीर्थपुरी या गावात मराठा आरक्षण आंदोलकांनी दगडफेक करून दर्शनीय काच फोडली आहे. तसेच यावेळी आंदोलकांनी बस पेटवून दिली आहे. या घटनेबाबत आगार व्यवस्थापक यांच्याकडून पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 


जालना जिल्ह्यातील एसटी सेवा बंद....


जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आल्याने राज्य परिवहन मंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने जिल्ह्यातील 5 आगरांच्या बस बंद करण्याच्या निर्णय घेतलाय, पोलिसांचे पुढील आदेश येऊपर्यत बस बंद राहणार आहे. विशेष म्हणजे पैठण- संभाजीनगर एसटी बस सेवा देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद...


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, सध्या आहे त्यात आगारात, डीपोत बस उभ्या करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या :


मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी