Marathwada Water Shortage : एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे राज्यावर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात (Marathwada) तर पाण्याची भीषण परिस्थिती पाहायला मिळत असून, अनेक गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्याची तहान भाग्वणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) केवळ 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed), लातूर (Latur), हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani) धाराशिवसह (Dharashiv) नांदेड (Nanded) जिल्ह्यात अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 


 कुठे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा, तर कुठे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती करण्याची वेळ मराठवाड्यातील अनेक भागातील गावकऱ्यांवर आल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. एकीकडे राज्यातील प्रशासन आणि सत्ताधारी निवडणुकीच्या कामात व्यस्थ आहेत, तर दुसरीकडे मराठवाड्यातील नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. कारण अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होत आहे. विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असून, अनेक प्रकल्प देखील कोरडेठाक पडली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 348 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, मराठवाड्यात हा आकडा 600 पार पोहचला आहे.


मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती...



  • छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पण, धरणात फक्त 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे संभाजीनगर शहराला 7 ते 8 दिवसांत 1 तास पाणी मिळते. तसेच जिल्ह्यात 230 गावांना 348 टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

  • बीड जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे 26 प्रकल्प कोरडे पडले आहेत. आता सर्व प्रकल्पात मिळून 8.39 टक्के म्हणजेच 64.383 दश लक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यात 24 गावांसाठी 21 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर, बीडकरांना 15 दिवसात केवळ 2 तास पाणी पुरवठा होतो.

  • हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणामध्ये फक्त 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच हिंगोली, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा नागनाथ, वसमत या तालुक्यामध्ये पाण्याची भीषणता पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये नागरिक पाण्यासाठी रात्र जागून काढत आहे.

  • जालना जिल्हा देखील पाणी टंचाईच्या सावटाखाली असून, जिल्ह्यात 47 गाव आणि 55 वाड्यावरती पाणीटंचाईचे तीव्र सावट आहे. जिल्ह्यात जवळपास 250 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आले असून, 450 टँकरच्या माध्यमातून गावांची तहान भागवली जाते. जालना शहरातील पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय पूर्णपणे आटला आहे. त्यामुळे शहराची तहान जायकवाडी धरणावर अवलंबून आहे. जालना शहरांमध्ये काही भागात पाचव्या दिवशी, तर काही भागात आठव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. जालन्यात 235 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.

  • परभणी जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काळात पाणी टंचाईला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. सध्या येलदरीत 40 टक्के, तर लोअर दूधनात 8.5 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.परभणी शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

  • नांदेड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी धरणाचा पाणीसाठा 39 टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

  • लातूर जिल्ह्यातील 144 पाणी प्रकल्पात फक्त 9 टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात 18 गाव आणि एका वाडीमध्ये 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, 98 गावांना 110 विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.


मतदार मतदानातून पाणी पाजतील? 


प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्थ आहे. त्यातच राजकारणी सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाकडे वेळ देण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुष्काळात पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना नागरिकांनी मतदानातून पाणी पाजल्यास नवल वाटू नयेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा