जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडला मकोका लावला आता त्याला 302 लावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच वाल्मिक कराडची टोळी ही राज्यभर पसरली असून त्या सर्वांवर कारवाई करावी आणि यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीला राज्यासमोर आणावं असंही ते म्हणाले. एका व्यक्तीसाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरू नका अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "खुनातील आणि खंडणीतील आरोपी हे एकच आहेत. यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा. या सगळ्यांना सांभाळणारे कोण? यांना पैसा कुणी पुरवला? याचा शोध लावला पाहिजे.एका माणसासाठी पूर्ण राज्याला वेठीस धरू नका. ही टोळी जातीयवादी आहे. काही लोकांनी त्यांच्या जातीला बदनाम केलं. मारामाऱ्या, खून, खंडणीतील या टोळीमुळे संपूर्ण जात बदनाम होते."
टोळीला सांभाळणारा व्यक्ती समोर आणा
मनोज जरांगे म्हणाले की, "यांना साथ देणारी टोळी ही राज्यभर पसरलेली आहे. त्यांना जोपर्यंत कायद्याच्या कचाट्यात पकडत नाही तोपर्यंत उपयोग नाही. या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. या टोळीला सांभाळणारा व्यक्ती समोर आला पाहिजे."
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा
संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. ऐन संक्रांतीच्या दिवशीच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :