बीड : खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. त्याची परवानगी एसआयटीने मिळवली होती. या प्रकरणी एसआयटीकडून कराडला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे. वाल्मिक कराडला आधीच मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या भोवतीचा फास आवळण्यात येणार आहे.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला बीडमध्ये नेण्यात आलं. मात्र त्याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने प्रोडक्शन वॉरंट दाखवून त्याचा ताबा घेतला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा पुरावा असल्याचा दावा एसआयटीने केला असल्याची माहिती आहे. या आधी खंडणीच्या गुन्ह्यातही एसआयटीकडेच त्याचा ताबा होता.
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला पहिल्यांदा तुरुंगात नेलं गेलं. त्यानंतर एसआयटीकडून त्याला हत्येच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं.
काय म्हणाले वाल्मिक कराडचे वकील?
खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव आलं नाही असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. मात्र मकोका संबंधित आमच्यापर्यंत कोणतीही कागदपत्रं आलेली नाही. ती पाहिल्यानंतर पुढे आम्ही पाऊल उचलू असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं.
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा
संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. ऐन संक्रांतीच्या दिवशीच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या सातही आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: