जालना : पाच वर्षे काम केली तरी मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते. हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. सिल्लोडची आगामी नगरपरिषदेची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असं सत्तार यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांना संबोधित करताना सत्तार यांनी हे वक्तव्य केलं. 


निवडणुकीत जात-पात आणि धर्म आणला जातो


अब्दुल सत्तार म्हणाले की, "यावेळी आम्ही काठावर निवडून आलो. पण सध्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे, ते भविष्यासाठी घातक ठरत आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही माझी शेटवची निवडणूक असेल. विधानसभेच्या निवडणुकीत मी उभे राहणार नाही. त्यामुळे कुणी काही माझं वाकडं करू शकत नाही. माझ्या मुलांला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ. मी लढणार नाही. मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होते."


शेवटच्या टप्प्यात जातीपातीवर प्रचार


मी सिल्लोडची विधानसभा लढणार नाही. मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद पाहिजे. जातीवादामध्ये माणूसकीही सोडून द्यावी लागते असंही सत्तार म्हणाले. 


अब्दुल सत्तार म्हणाले की, "पाच वर्षे सातत्याने 18 तास काम करायचं. पण विधानसभा मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद, धर्मावर प्रचार सुरू होतो. जात धर्मावर निवडून आलेले लोक हे मरणाऱ्यांना कफनही देणार नाहीत. ते कोणताही निधी आणणार नाहीत. लोकांना लागलेली ही सवय बदलावी लागणार आहे. नाहीतर राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही, कुणीही कुणाला मदत करणार नाही."


मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज


अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रिपद मिळालं नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या ठिकाणी संजय शिरसाटांना संधी देण्यात आली. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये शाब्दीक राजकारणही रंगताना दिसतंय. अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या तानाजी सावंत, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा :