जालना : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी लातूर जिल्ह्यातील वांगदरी गावात जाऊन ओबीसी आरक्षणाच्या लढाईत आपला जीव दिलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, ओबीसी बांधवांना (OBC) आवाहन करत कुणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, आधी आम्ही संपू, नंतर तुम्ही काय करायचे ते करा, असे म्हटले. तसेच, आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ आपल्या बांधवावार आल्याचेही भुजबळ यांनी म्हटले होते. आता, छगन भुजबळांच्या लातूर दौऱ्यासंदर्भात बोलताना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, ह्याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे. तो आता अंधश्रद्धा बाळगत आहे, असा पलटवार केला. तसेच, ह्याला तिकडं नेपाळ, नागालँडमध्ये सोडायला हवं, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
तू 32 टक्के खातो असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे ते आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचं आहे का? तू प्रगत झाला आहे. तू ते आरक्षण सोड ना. तुझं अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळं यानेच खाल्लं आहे. राजकारणापायी हे ओबीसींना उलटे समजाऊन सांगत आहे. याचं ऐकू नका, हा मेटाकुटीला आला आहे. डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे, याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
नेपाळ, नागालँडला सोडायलं हवं
मुंबईत येऊन हैदोस घातला असे भुजबळ यांनी म्हटल्याचा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारण्यात आला होता. त्यावर, याला देवाने अक्कल दिली असती तर बरं झालं असतं, मुंबईत मराठ्यांची पोरं गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली, मुंबईचे खरे मालक ही पोरं होते, तिथले लोक पाहुणे आहेत. ह्यो इथं शोभत नाही, ह्या जनावराला नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवं, ह्याला नागालँड, इंग्लड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला. तसेच, महाज्योतीला यापूर्वी हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? सारथीला आता कुठे यायला लागले आहेत. वेडा वाकडा जीआर यानेच 1994 साली काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यत मिळवलं आहे, असेही पाटील यांनी म्हटले.