जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. 


मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता प्रशासन कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय झाला. तसेच आता मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे फडणवीस माल जीवे मारण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या सागर बंगल्यामोर जाऊन बसणार असल्याच्या भुमिकेवर जरांगे ठाम आहे. 


मनोज जरांगे रात्री भांबेरी गावात मुक्कामाला...


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी थेट मुंबईकडे निघण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फडणवीस यांना माझा जीव घ्यायचा असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर जातो आणि त्यांनी माझा बळी घ्यावा असे जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांना भांबेरी गावातील गावकऱ्यांनी अडवले. तसेच, रात्रीचा मुक्काम देखील गावातच करण्याचा आग्रह देखील केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी रात्रीचा मुक्काम भांबेरी गावात केला आहे. तसेच, मुंबईला जाण्याच्या भुमिकेवर ते ठाम आहे. 


भांबेरी गावात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त 


मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक आंदोलक कालच आंतरवालीत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी जरांगे यांच्या ताफ्यात अंदाजे 300 पेक्षा अधिक गाड्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढील आंदोलनाच्या बाबतीत मनोज जरांगे कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. मात्र, सध्या भांबेरी गावात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी