Jalna News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबडच्या पागीरवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली असून, सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. या 30 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. 9 मार्च रोजी पागीरवाडी येथे ही घटना घडली. तर याप्रकरणी मयताची पत्नी उषा काळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत साहेबराव काळे (वय 30 वर्षे, रा. पागीरवाडी, ता. अंबड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, भारत काळे आपल्या पत्नी, मुलगा, मुलगीसह अंबड तालुक्यातील पागीरवाडी शिवारात राहतात. काळे यांची याच परिसरात अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. पण कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे काळे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. दरम्यान त्यांनी काही वर्षांपूर्वी संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने, रख्माजी कुंडकर आणि के. के. भोजने ( सर्व रा. जामखेड, ता. अंबड) यांच्याकडून शेतीच्या कामासाठी व्याजाने कर्ज घेतले होते. मधल्या काळात त्यांनी काही प्रमाणात कर्जाचे पैसे परत देखील केले. परंतु, सावकारांनी व्याजाच्या पैशाची वारंवार मागणी करत, भारत काळे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. एवढच नाही तर संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने यांनी भारत यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण देखील केली होती.


विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या...


सावकारांकडून व्याजाच्या पैशाची वारंवार होणारी मागणी आणि मारहाण यामुळे भारत काळे हे चिंतेत होते. त्यामुळे घरात देखील कोणाशी बोलत नव्हते. दरम्यान 9 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पागीरवाडी येथील दत्ता अच्युत पागीरे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊनम भारत यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण शुक्रवारी रात्री मयताची पत्नी उषा भारत काळे यांच्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी भोजने, कुंडलिक भोजने, रख्माजी कुंडकर, के. के. भोजने यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक वास्तव! कृषीमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा अन् मतदारसंघात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या